अभिनेत्री कंगना राणौतने शुक्रवारी पंजाबमधील किरतपूरमध्ये तिची कार शेतकऱ्यांनी घेरल्याचा आरोप केला. ही घटना चंदीगड-उना महामार्गावरील बुंगा साहिब, किरतपूर साहिब येथे घडली. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांनी तिच्या कारला कसे घेरले आणि तिच्यावर हल्ला केला असे सांगितले आहे. कंगनाने शेअर केलेला व्हिडिओ तिच्या गाडीच्या आतून शूट करण्यात आला असून वाहनाभोवती उभे असलेले शेतकरी मुर्दाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी पंजाबमध्ये पाऊल ठेवताच जमावाने माझ्या कारवर हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत, असे हा व्हिडिओ शेअर करत कंगना रणौतने म्हटले आहे. यानंतर, कंगनाने आणखी बरेच व्हिडिओ देखील शेअर केले आहेत ज्यात तिने बाहेरच्या स्थितीवरुन टीका केली आहे.

व्हिडिओमध्ये कंगना सांगत आहे की ती हिमाचलमधून आली होती आणि पंजाबमध्ये पोहोचताच जमावाने तिच्या कारवर हल्ला केला आहे. हे लोक स्वतःला शेतकरी म्हणवून घेत आहेत आणि मला घाणेरडी शिवीगाळ करत आहेत. मला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहेत, असे कंगना म्हणाली. देशात अशा प्रकारच्या मॉब लिंचिंगच्या घटना घडत आहेत. येथे सुरक्षा नसेल, तर येथे तशीच परिस्थिती निर्माण होईल, असे कंगनाने म्हटले.

थोड्या वेळानंतर, कंगनाने काही नवीन व्हिडिओ शेअर केले ज्यामध्ये ती महिला शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडिओंमध्ये कंगना रणौत एका महिला शेतकऱ्याला तू माझ्या आईसारखी आहेस सांगताना दिसत होती. यानंतर काही वेळातच अभिनेत्रीने आणखी काही व्हिडिओ शेअर केले ज्यात ती सुरक्षितपणे निघून गेल्याचे सांगत होती. या व्हिडिओमध्ये कंगनाने पंजाब पोलीस आणि सीआरपीएफचे आभार मानले आहेत.

इतके पोलीस असूनही माझ्या गाडीला जाऊ दिले जात नाही. मी राजकारणी आहे की पक्ष चालवते?, असा सवाल कंगनाने केला. कंगना रणौतने सुवर्ण मंदिरातील तिचे काही फोटो शेअर करताना एक लांबलचक पोस्ट लिहिली होती ज्यामध्ये तिने शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले होते आणि त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्याचे सांगितले होते.

“मी या प्रकाराला घाबरत नाही. देशाविरुद्ध कट रचणाऱ्यांविरुद्ध आणि दहशतवादी शक्तींविरुद्ध मी बोलते आणि नेहमी बोलत राहीन. निष्पाप जवानांची हत्या करणारे नक्षलवादी असोत, तुकडे-तुकडे गॅंग असोत किंवा ऐंशीच्या दशकात पंजाबमधील गुरुंच्या पवित्र भूमीचे तुकडे करून खलिस्तान बनवण्याचे स्वप्न पाहणारे परदेशात बसलेले दहशतवादी असोत,” असे कंगना म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut car stop by mob in punjab shares video abn
First published on: 03-12-2021 at 17:32 IST