अभिनेत्री कंगना रणौत आणि आदित्य पांचोली यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहे. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगनाने तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आदित्यवर शोषणाचा आरोप केला होता. कंगनाने केलेले आरोप फेटाळत आदित्य आणि त्याची पत्नी झरीना वहाब यांनी तिला मानहानीची नोटीस पाठवली होती. या नोटीशीला आता कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी उत्तर दिले आहे.
‘आदित्य पांचोली आणि झरीना वहाब यांच्या वकीलाकडून मिळालेल्या मानहानीच्या नोटीशीला आम्ही योग्य उत्तर दिले आहे. २००७ पासूनच कंगनाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये तिच्या वैयक्तिक अनुभवांविषयी बेधडकपणे वक्तव्ये केली आहेत. मानहानीचा दावा करण्याची धमकी देत कोणालाही महिलेचा (पीडित) आवाज दाबण्याची संधी कोणतेही नियम देत नाहीत,’ असे कंगनाचे वकील सिद्दीकी म्हणाले.
वाचा : ‘पद्मावती’मुळे रणवीरला झाला मानसिक आजार?
रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात कंगनाने बरेच खुलासे केले होते. हृतिक रोशन, अध्ययन सुमन, आदित्य पांचोली यांच्यावर तिने काही आरोपही केले होते. बॉलिवूडमधील स्ट्रगलिंगच्या काळात कंगना आदित्य पांचोलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आदित्यने मला घरात डांबून ठेवून माझे शोषण केल्याचा आरोप तिने या मुलाखतीत केला होता. याविरोधात त्याने स्पीड पोस्टद्वारे कंगनाला मानहानीची नोटीस पाठवली होती.