Varun Aradya and Varsha Kaveri Case: कन्नड अभिनेता वरुण अराद्यने त्याची पहिली प्रेयसी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर वर्षा कावेरीला धमकावून तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याबद्दल आता त्याच्यावर बंगळुरू येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरुणचे दुसऱ्या मुलीशी संबंध प्रस्थापित झाल्याचे कळल्यानंतर वर्षा कावेरीने त्याला जाब विचारला होता. यानंतर संतापलेल्या वरुण अराद्यने वर्षाला धमकावून तिचे खासगी फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, वर्षा आणि वरुण यांची ओळख सोशल मीडियावर झाल्यानंतर २०१९ पासून ते एकत्र होते. दरम्यान २०२३ मध्ये वरुणचे दुसऱ्या महिलेबरोबर संबंध निर्माण झाले. या दोघांचे आक्षेपार्ह फोटो हाती आल्यानंतर वर्षाने वरुणला जाब विचारला. यावेळी दोघांचेही कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर वरुणने वर्षाचे तोंड बंद करण्यासाठी तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
वर्षाने बंगळुरू पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, तिच्या संमतीशिवाय वरुणने तिचे चोरून व्हिडीओ चित्रित केले होते. १० सप्टेंबर २०२३ रोजी वरुणने वर्षाच्या मोबाइलवर तिचेच खासगी फोटो पाठविले. जेव्हा तिने याबद्दल त्याला विचारणा केली, तेव्हा वरुणने तिच्याशी घाणेरड्या भाषेत संवाद साधला. तसेच वर्षाला जीवे मारण्याचीही धमकी दिली.
वर्षाने पुढे म्हटले की, वरुणने मला इतर कुणाशी लग्न केल्यास जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली होती. अनेक महिने वरुणच्या भीतीच्या सावटाखाली राहिल्यानंतर वर्षाने अखेर पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ७ सप्टेंबर २०२४ रोजी वर्षाने बंगळुरुच्या बसवेश्वरनगर पोलीस ठाण्यात वरुण विरोधात तक्रार दाखल केली. वर्षाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
वरुणच्या वतीने अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मल्याळम सिनेसृष्टीत सध्या हेम समितीच्या अहवालानंतर वादळ निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम बाजूच्याच तमिळ आणि तेलगू सिनेसृष्टीवरही झालेला दिसत आहे. तसेच कन्नड चित्रपटसृष्टीत अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्र गौडा यांनी चाहत्याची हत्या केल्याचे प्रकरण गाजत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा कन्नड अभिनेता चर्चेत आला आहे.