गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या कपिल शर्मा याला बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने अंधेरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कपिल शर्माचा kapil sharma रक्तदाब वाढल्यामुळे त्याला ‘द कपिल शर्मा’ शोच्या सेटवरच बुधवारी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे.
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेते आणि खासदार परेश रावल यांच्या आगामी ‘वेलकम टू लंडन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते बुधवारी कपिल शर्मा शोमध्ये येणार होते. या भागाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच कपिलला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे चित्रीकरण रद्द करून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याचा रक्तदाब वाढल्याचे लक्षात आले. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत.
‘द कपिल शर्मा’ शोमधील त्याचा सहकलाकार किकू शारदा यानेही कपिल शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजारो दिला आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पण यामध्ये घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. त्याची प्रकृती आता ठिक आहे, असे किकू शारदाने म्हटले आहे.
सुनील ग्रोव्हर आणि इतर काही सहकलाकारांसोबत विमानात घडलेल्या प्रसंगानंतर कपिल शर्मा सातत्याने चर्चेत आहे. सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे सोनी टीव्हीवरील या शोचा टीआरपीही कमी झाला आहे. या तिघांच्या एक्झिटनंतरही आपला शो प्रसिद्धीच्या झोतात राहावा, यासाठी कपिलने वेगवेगळे प्रयत्न केले. पण त्याला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही.