बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले आहे. ‘दोस्ताना २’ या चित्रपटाची घोषणा २०१८मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या चित्रपटात कार्तिक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असे सांगण्यात आले होते. पण आता कार्तिकच्या ऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्याला मुख्य भूमिकेत घेतले असल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकने ‘दोस्ताना २’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले होते. २० दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर त्याने पुढील डेट्स देण्यास नकार दिला होता. सध्या कार्तिककडे अनेक प्रोजक्ट्स असल्यामुळे तो कामात व्यग्र आहे. तसेच कार्तिकला या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील फारशी आवडली नसल्याने त्याने डेट्स दिल्या नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता करण जोहरने त्याला चित्रपटातून काढून टाकल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा : ‘तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?’ असे विचारणाऱ्याला जाणून घ्या रिंकू काय म्हणाली

२०१९मध्ये नोव्हेंबर महिन्यात जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. अमृतसर येथे चित्रीकरण करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता ‘दोस्ताना २’ या चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘दोस्ताना २’ हा २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दोस्ताना’ या हिट चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. आता दोस्ताना २मध्ये काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.