सध्याचं बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील पण सर्वांचं लाडकं कपल म्हणजे अभिनेत्री सारा अली खान आणि कार्तिक आर्यन. हे लव्हबर्ड्स अनेक वेळा एकत्र फिरताना, डिनर डेटवर जाताना दिसतात. पण या दोघांनी जाहिरपणे नात्याच्या कबूली दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण दोघांमधील स्पेशल बॉन्डींग पुन्हा दिसू लागलं आहे. सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कार्तिक साराची किती काळजी घेतो हे दिसून आले.
सारा आणि कार्तिकचा व्हायरल झालेला व्हिडीओ स्टार अवॉर्ड्स २०१९ सोहळ्यामधील आहे. या सोहळ्यात कार्तिक साराला एक सँडल काढून रॅम्प वॉक करण्याचे चॅलेंज देतो. सारा कार्तिकने दिलेले चॅलेंज स्वीकारते. ती एका पायातील सँडल काढते आणि वॉक करते. दरम्यान तिचा पाय ड्रेसमध्ये अडकतो. पण तितक्यात कार्तिक साराचा हात पकडून तिला आधार देतो आणि पडता वाचवतो.
व्हिडीओमधील सारा आणि कार्तिकची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. त्यांचा हा व्हिडीओ एका फॅन क्लबने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सारा आणि कार्तिक लवकरच इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.