चित्रपट कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांचे विविध फंडे आजवर अनेकांच्याच कुतुहलाचा विषय आहे. चित्रपटाच्या यशापोटी अनेक कलाकरांच्या काही धार्मिक मान्यतासुद्धा असतात. अशाच कलाकारांच्या यादीत अभिनेत्री कतरिना कैफचेही नाव येते. कतरिना तिच्या चित्रपटांच्या यशासाठी अनेकदा दर्ग्यात जाऊन प्रार्थना करते. पण गेले काही दिवस कतरिना तिच्या ‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये फार व्यस्त होती. त्यामुळे तिला दर्ग्यात जाण्याची संधी मिळाली नव्हती. पण चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चार दिवसांनी मात्र वेळात वेळ काढून कतरिनाने दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली. फतेहपूर सिक्रि येथील हजरत चिश्तींच्या दर्ग्याला कतरिना कैफने भेट दिली आणि चित्रपटाच्या यशासाठीची प्रार्शना केली.
दर्ग्यात जाताना कतरिनाने पारंपारिक वेशभूषेला प्राधान्य दिले होते. यावेळी कतरिना एका पांढऱ्या शुभ्र सलवार-कुर्तीमध्ये दिसत होती. सोबतच तिने ओढणीने चेहरासुद्धा झाकला होता. धार्मिक रुढीसुद्धा तितक्याच आत्मियतेने पाळणाऱ्या या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. नित्या मेहरा यांच्या दिग्दर्शनात बनलेला ‘बार बार देखो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाची भूमिका साकारत असून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
सिद्धार्थ आणि कतरिनाची अनोखी केमिस्ट्री असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने वारंवार प्रसारमाध्यमांसमोर येणाऱ्या कतरिना कैफच्या नव्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. एका वेगळ्याच कथानकाला हाताळत रसिकांच्या भेटीला आलेल्या ‘बार बार देखो’ या चित्रपटाने ‘फ्रीकी अली’ या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत पिछाडीवर टाकले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2016 रोजी प्रकाशित
हजरत चिश्तींच्या दर्ग्यात चेहरा झाकून पोहोचली कतरिना..
दर्ग्यात जाताना कतरिनाने पारंपारिक वेशभूषेला प्राधान्य दिले होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 13-09-2016 at 12:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif went hazrat chisti dargah fatehpur sikri