अभिनेत्री किर्ती कुल्हारी आणि तिचा पती साहिल सेहगल या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. किर्तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत याविषय़ी माहिती दिली आहे. तसंच यावर कोणत्याही प्रकारचं भाष्य करणार नसल्याचंही तिने सांगितलं आहे.

किर्ती आणि साहिलने हा निर्णय त्यांनी परस्पर संमतीने घेतला आहे, कायदेशीर पद्धतीने नाही. २०१६मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं. “ज्यांना खरंच माझी काळजी आहे त्यांच्यासाठी सांगते, मी चांगल्या मनस्थितीत आहे आणि इथून पुढे यावर कोणतंही भाष्य करणार नाही”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ती म्हणते, “सगळ्यांना सांगत आहे की मी आणि माझा पती साहिल आम्ही विभक्त होण्याचं ठरवलं आहे. कागदोपत्री जरी नसलो तरी आयुष्यात वेगळे होत आहोत. कोणासोबत तरी राहण्याच्या निर्णयापेक्षा हा निर्णय नक्कीच अवघड आहे. कारण एकत्र येण्याचा सोहळा हा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत, प्रेमाच्या माणसांसोबत साजरा केला जातो.”

ती पुढे म्हणाली, “कोणासोबत न राहण्याचा निर्णय हा इतका सोपा नसतो. पण जे आहे ते आहे. हा निर्णय त्याच लोकांना दुखावणारा असतो.”

 

या पोस्टचा शेवट करताना ती म्हणते, “ज्यांना माझी खरच काळजी आहे त्यांच्यासाठी सांगते मी ठीक आहे, चांगल्या परिस्थितीत आहे आणि आशा करते की ज्यांच्यामुळे मला फरक पडतो तेही असतील. या विषयावर इथून पुढे कधीच, काहीच बोलणार नाही. “

गेल्या वर्षी एका मुलाखतीत किर्ती म्हणाली होती की, साहिलसोबत लग्न केल्याचे तिच्या करीयरवर सकारात्मक परिणाम झाले. साहिलने तिला हरप्रकारे मदत केली आणि ती ती आत्ता ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पाठिंबा दिला.

किर्तीचं ‘फोर मोअर शॉट्स’ या वेबसीरीजमधलं काम विशेष नावाजलं गेलं. तिने ‘उरीः द सर्जिकल स्ट्राईक’, ‘इंदू सरकार’, ‘पिंक’, ‘ब्लॅकमेल’, ‘मिशन मंगल’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.