‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री माहिरा शर्मा सध्या ‘दादासाहेब फाळके’ या पुरस्कारामुळे चर्चेत आहे. तिच्यावर बनावट पुरस्कार प्रमाणपत्र तयार करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र हे आरोप माहिराने फेटाळून लावले आहेत. दादासाहेब फाळके समितीनेच तिला हा पुरस्कार दिल्याचा दावा तिने केला आहे.

बनावट पुरस्काराचं हे प्रकरण काय आहे?

माहिराने काही दिवसांपूर्वी एक इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिला ‘दादासाहेब फाळके’ या पुरस्काराने सन्मानित केल्याचा दावा तिने केला होता. बिग बॉसमधील सर्वात फॅशनेबल स्पर्धक म्हणून तिला हा पुरस्कार मिळाल्याचे तिने म्हटले होते. परंतु ‘दादासाहेब फाळके आंतराष्ट्रीय पुरस्कार’ समितीने हा दावा फेटाळून लावला. असा कुठलाही पुरस्कार त्यांनी तिला दिलेला नाही असं एका इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं. शिवाय खऱ्या आणि खोट्या पुरस्कारामधील फरकही त्यांनी तिला समजावून सांगितला. मात्र बनावट प्रमाणपत्राचा अरोप माहिराने फेटाळून लावला आहे. तिला अधिकृतरित्या हा पुरस्कार मिळाल्याचे तिने म्हटले आहे. ‘पर्पल फॉक्स मीडिया’ या कंपनीच्या प्रेमल मेहता यांनी फाळके पुरस्कार टीमच्या वतीने तिच्याशी संपर्क साधला आणि या बाबत माहिती दिली. तसेच पुरस्कारादिवशी प्रचंड गर्दी असल्यामुळे तिच्या मॅनेजरकडेच पुरस्कार सोपवण्यात आला. अशा शब्दात माहिराने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान या खोट्या पुरस्कारावरुन माहिराला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. कारण दादासाहेब फाळके या भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. परिणामी तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.