‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँशी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चित्रपटाच्या निर्मितीत काहीना काही अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून चित्रपटासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैसे न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. हा वाद ताजा असताना या चित्रपटात काम करणारा अभिनेता अँडी वॉन इचनंही संपूर्ण मानधन न मिळाल्यानं आपली नाराजी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
या चित्रपटात अँडी ब्रिटीश अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ‘मणिकर्णिका..’ चा भव्य दिव्य ट्रेलर लाँचचा सोहळा मुंबईत पार पडल्यानंतर अँडीनं ट्विट करत मानधन न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे, तरीही मला माझ्या कामाचे पूर्ण पैसे अद्यापही मिळालेले नाही. कंगना राणोतला हे माहीत असेल असं मला वाटत नाही. मला माझे पैसे मिळण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे, असं तो ट्विटमध्ये म्हणाला आहे. मात्र ट्विट केल्यानंतर काही तासातच या जर्मन अभिनेत्यानं आपलं ट्विट डिलीट केलं आहे.
या चित्रपटाच्या निर्मात्यांवर जवळपास १.५ कोटी रुपये थकविल्याचा आरोप क्रू मेंबर्सनी केला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून चित्रपटासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पैसे अद्यापही दिले नसून ज्यूनिअर कलाकारांचेही २५ लाख रूपये देणे बाकी असल्याचे, वेस्टर्न इंडियाच्या सिने कर्माचाऱ्यांच्या संघाने म्हटलं आहे. ऑक्टोबरपर्यंत पैसे मिळणं अपेक्षित होते. मात्र ते अद्यापही मिळालेले नाही. हा वादा ताजा असताना आता अँडी इचच्या ट्विटनं निर्मात्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी या वादावर बोलताना कंगनानं आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘चित्रपटासाठी काम करणाऱ्या लहानातल्या लहान व्यक्तींचे पैसे थकवणं देखील चुकीचं आहे. हा अन्याय आहे. जर असं घडलं असेल तर मी स्वत: क्रू मेंबरच्या पाठीशी उभी राहिल. या चित्रपटासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीचे पैसे जरी थकले असतील तरही मी चित्रपटाचं प्रमोशन करणार नाही’ असं म्हणत कंगानानं आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता अँडीच्या ट्विटवर कंगना काय स्पष्टीकरण देते हे पाहण्यासारखं ठरेल.