देशातील लोकशाही धोक्यात असल्याची भीती अनेकांना वाटतेय? या प्रश्नावर बोलताना अभिनेता मनोज वायपेयी यांनी भीती वाटणाऱ्यांना निवडणूक लढवण्यााचा सल्ला दिला आहे. “ज्यांना भीती वाटते त्यांनी सरकारविरोधात निवडणुकीत उतरावं,” असं मनोज वाजपेयीनं म्हटलं आहे.
आरफा खान शेरवानी यांनी अभिनेता मनोज वाजपेयीची अलिकडेच एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत मनोज वाजपेयीला देशातील लोकशाहीच्या भविष्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. ‘भविष्यात देशात लोकशाही असेल की नाही, अशी शंका लोकांना वाटू लागली आहे?,’ असा प्रश्न आरफा खानम शेरवानी विचारला. त्याला मनोज वाजपेयीनं उत्तर दिलं.
“मी तज्ज्ञ नाहीये. पण मला असं वाटत की या देशातील लोकशाही कुठेही जाणार नाही. मी खूप आशावादी आहे. मला कळत नाही, लोकांना भीती का वाटू लागली आहे. बघा प्रत्येक पाच वर्षांनी निवडणुका होतात. ज्यांना भीती वाटतेय, त्यांनी सरकार विरोधात निवडणुकीत उतरावं,” असं उत्तर वाजपेयीनं दिलं.
इतर विषयांवरही केलं भाष्य
या मुलाखतीत मनोज वाजपेयीनं इतर विषयांवरही आपली मत मांडली. “राजकीय मुद्यांवर मतप्रदर्शन केल्यास कलाकारांना काम मिळणं कमी होत असं मला असं वाटत नाही.” चित्रपटांच्या माध्यमातून राजकारण केलं जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला,”मी पद्मावत चित्रपट पाहिला. यात आपण जास्तच अभ्यास करायला लागलो नाही का? असा प्रश्न मला पडला. मुघल ए आझम कोणत्याही प्रकारे खरी होती का? जो इतिहास आपण वाचला, त्यांच्याशी तिचा संबंध आहे का? नव्हता. मी पद्मावत चित्रपट बघितला, मला कोणतीही आक्षेप वाटला नाही. मी उरी चित्रपट बघत होतो. त्यातील एक दृश्य बघून रडलो,” असंही मनोज वाजपेयी म्हणाला.