मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे. अलिकडेच मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. सध्या या दोघांचं केळवण सुरु असून नुकतंच त्यांच्या जवळच्या मैत्रिणींनी त्यांचं केळवण केलं आहे.

अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि शर्मिला शिंदे यांनी आस्ताद-स्वप्नालीचं केळवण केलं आहे. याचे काही फोटो शर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून आस्ताद आणि स्वप्नाली एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती. अखेर ही जोडी लवकरच विवाहबंधनात बांधली जाणार आहे. सध्या स्वप्नाली स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत झळकत आहे. तर आस्ताद चंद्र आहे साक्षीला या मालिकेत काम करत आहे.