करोना नावाचं संकट जगावर आलं आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागला. या आजाराची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. आजूबाजूचं वातावरण जरी नकारात्मक असलं तरी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना आयुष्याला नवी उभारी देतात. अभिनेता आशुतोष गोखले सध्याच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे.

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकच्या रुपात तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. करोनाच्या संकटामुळे शूटिंग थांबलं असलं तरी आशुतोषने हाती घेतलंल काम अविरत सुरु आहे. एका स्वयंसेवी संस्थेसोबत तो जोडला गेलाय. ही संस्था मुंबईतील बेघर आणि या कठीण काळात उपासमार होत असलेल्या गरजूंना जेवण पोहोचवण्याचं काम करते. गेल्या काही दिवसांपासून आशुतोष या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतोय.

आणखी वाचा : निवेदिता यांनी सांगितली अशोक सराफ यांच्या नावामागची कहाणी; पाहा ‘हा’ खास फोटो

ही संस्था दररोज ७५ हजारांहून अधिक फूड पॅकेट्सचं वाटप करते. आशुषोत दररोज वांद्रे ते दहिसर लिंक रोड, ओशिवरा, जुहू, गोरेगाव अशा भागातील गरजूंना अन्न पोहोचवतो. अर्थात सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करत आणि आवश्यक ती काळजी घेत आशुतोष हे काम नित्यनेमाने करतो आहे.

या उपक्रमाविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, “आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं देणं लागतो. याच जाणीवेतून हा उपक्रम हाती घेतला. समाजभान जपण्याची ही एक चांगली संधी आहे. माझ्या कुटुंबियांचा देखील मला पाठिंबा आहे. करोनाचा संकट लवकरच सरेल आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात होईलच. पण सध्या वेळ सत्कार्णी लागत असल्याचा आनंद आहे.”