मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने स्पर्धक ते परीक्षक, असा प्रवास पूर्ण केला. अनेक अवॉर्ड शो, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोजमध्ये आशिष पाटीलने नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. लावणी जगणाऱ्या या कलाकाराला कालातंराने ‘लावणीकिंग’, असं नाव पडलं. नुकतंच आशिषने त्याचं एक स्वप्न सत्यात उतरवलंय आणि ते म्हणजे ‘कलांगण’ नावाचा त्याचा स्वत:चा डान्स स्टुडिओ.

आशिषचा यशाच्या शिखरावर पोहोचण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. यादरम्यान त्याला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. त्याबद्दल त्याने नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘सेलिब्रिटी कट्टा’च्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नृत्य क्षेत्रात स्त्री पात्र निभावणाऱ्या मुलांना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं याबद्दल त्याने सांगितलं. आशिष म्हणाला, “पुरुष लावणी कलाकारांचा खरंच खूप मोठा संघर्ष आहे. खूप वर्षांपूर्वी एक कार्यक्रम होता ‘बिन बायकांचा तमाशा’. त्या नावातच सगळं आलं. ‘बिन बायकांचा तमाशा’ म्हणजे संगीतापासून ते डान्सरपर्यंत सगळे पुरुष असायचे. पुरुष स्त्रीच्या आवाजात गायचे, वाजवायचे आणि नाचणारेपण अर्थात पुरुष होते. तेव्हा मी त्यांचा स्ट्रगल बघितला होता. समाजाकडून जो स्वीकार असावा लागतो, तो नव्हता. जे लोक कार्यक्रम पाहायला यायचे त्यातले अर्धे लोक अश्लील भाषा वापरायचे. तर काही लोक त्यांच्याकडे वेगळ्याच भावनेनं बघायचे.”

आशिष पुढे म्हणाला, “मला वाटतं लावणी तितकीच सुंदर आहे; जितकं कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्य आहे. आधी लावणीकडे लोक वेगळ्याच नजरेने पाहायचे. लावणी करते म्हणजे तमासगिरीणच आहे. हा वेश्याव्यवसाय आहे, असं काही लोकांना वाटायचं.”

या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन केव्हापासून बदलला असं विचारलं असता आशिष म्हणाला. “मला वाटतं की, ‘नटरंग’ सिनेमापासून हे सगळं बदललं. ‘वाजले की बारा’, ‘अप्सरा आली’ या गाण्यांमधून तो चित्रपट एका वेगळ्या पद्धतीने मांडला गेला. कसं एका कलाकाराला इतक वेड असू शकतं की, ज्याला राजा बनायचं होतं तो नाच्या बनला. त्या सिनेमामध्ये त्यांना किती खस्ता खाव्या लागल्यात हे दाखवलं गेलं.”

हेही वाचा… मसाबा गुप्ता-सत्यदीप मिश्रा होणार आईबाबा; गुडन्यूज शेअर करत म्हणाले, “आमच्या आयुष्यात…”

“एका पुरुष कलाकाराला जेव्हा तो स्त्री पात्र सादर करतो तेव्हा त्याच्याकडे खूप वेगळ्या भावनेनं पाहिलं जातं. आम्ही असेदेखील किस्से ऐकलेत की, शोच्या दौऱ्यादरम्यान काही जणांवर बलात्कार झालेत. काही जणांनी ते अनुभवलंय. मीसुद्धा प्रेक्षकांमधून तो स्पर्श अनुभवला आहे. अशा लोकांना वाटतं की, जे पुरुष स्त्री पात्र निभावतात ते ‘अशा गोष्टींसाठी’ सहजपणे उपलब्ध असतात.”, असंही आशिषने नमूद केलं.

हेही वाचा… ‘या’ मराठमोळ्या नृत्यदिग्दर्शकाला मिळाली संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी; म्हणाला, “माझे अश्रू अनावर…”

आपला अनुभव सांगताना आशिष म्हणाला, “अजूनही मी हे सगळं अनुभवतो. चारचौघात आपण कुठल्या कार्यक्रमात गेलो आणि कोणी फोटो काढायला आलं. तेव्हा ती व्यक्ती आपल्याला जो स्पर्श करते, तो स्पर्श आपल्याला लगेच कळतो. जेव्हा तुम्ही चारचौघात असता तेव्हा तुम्ही काही बोलू शकत नाही; पण त्या वेळेस तुम्ही कशी प्रतिक्रिया द्यायचीय ते तुमच्यावर असतं.”

हेही वाचा… “तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…

“पुरुष कलाकार जे स्त्री पात्र करतात, त्यांना अजूनही हे अनुभवताना मी बघतो आणि मला त्यांच्यासाठी भीती वाटते. खरंच यासाठी काहीच सुरक्षितता नाही आहे. आपण म्हणतो की, मुलींसाठी सुरक्षितता हवी; पण तशीच ती मुलांसाठीही असली पाहिजे, असं मला वाटतं. खासकरून त्यांच्यासाठी जे स्त्री पात्र करतात किंवा गावोगावी जाऊन लावणी सादर करतात, त्यांच्यासाठी गावातून बाहेर जाणं केव्हा केव्हा खूप कठीण होऊन जातं. मी काही कलाकारांना हेच सांगतो की, अशा गोष्टीकडे वळू नका की, जिथे तुम्हाला तुमचा स्वाभिमान गमवावा लागेल”, असंही आशिष म्हणाला.