मराठी रंगभूमीवर सध्या फार कमी नाटकं यशस्वी झालेली पाहायला मिळतात. काही जणांच्या मते मराठी रंगभूमीला थोडीशी मरगळ आली आहे. पण ही नाटकावर प्रेम करणाऱ्या मंडळींची मतं. पण खरंच ज्या व्यक्ती हा नाटकाचा व्यवसाय करतात, त्यांनाही असंच वाटतं का? हे प्रत्येकाला जाणून घ्यावंसं वाटतं. कारण या विषयावर अधिकारवाणीने भाष्य करायला नाटय़निर्मात्यांशिवाय दुसरं कुणी असूच शकत नाही. प्रत्येक प्रयोगासाठी होणारा खर्च, तारखांच्या समस्या, कलाकारांचे नखरे, त्यांच्या तारखा, हे सारं गणित जमवत त्यांना प्रयोग करायचा असतो. त्यामुळे सध्याच्या नाटकांच्या व्यावसायिक यशाविषयी निर्मातेच तंतोतंत माहिती देऊ शकतात.

भद्रकाली प्रोडक्शनने आतापर्यंत अर्धशतकापेक्षा जास्त नाटकं रंगभूमीवर सादर केली. एका मोसमात २-३ नाटकं हाऊसफुल्ल करण्याचाही त्यांनी विक्रम केला. या संस्थेचे निर्माते असलेल्या प्रसाद कांबळी यांना मात्र रंगभूमीला मरगळ आल्याचे वाटत नाही. ‘मराठी रंगभूमीवर वर्षांनुवर्षे पाहिलं २-३ नाटकं सुपरहिट, ४-५ हिट, ५-७ व्यवस्थित चालायची तर त्यानंतरच्या ४-५ नाटकं ही खर्चाचं गणित जेमतेम जुळवणारी असायची. पूर्वी प्रत्येकाचा एक वर्ग ठरलेला होता. नायक-नायिका किंवा नाटय़संस्था यांच्याकडे पाहून चाहते नाटकाला यायचे. प्रत्येक क्षेत्रात स्थित्यंतर होत असतं, तेच नाटकांबाबतीतही होताना दिसतं. काही नटांनी स्वत:च्या नाटय़संस्था काढल्या. सध्याच्या घडीला मनोरंजनाची साधन भरपूर आहेत. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होत असतानाही मराठी रंगभूमीवर वर्षांला ४०-५० नाटकं येतात, यामधील बहुतांशी नवीन असतात. पूर्वी जर नाटकाचे हजार प्रयोग झाले तर त्याच्यातील ३५-४० टक्के प्रयोग हे दौऱ्यावर केलेले असायचे किंवा काही ज्या मोठय़ा संस्था आहेत ते वर्षांतून एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना स्नेहसंमेलनात नाटक दाखवायचे. पण या संस्थामधील मोठय़ा पदावर जास्त मराठी माणसं नसल्याने त्या गोष्टीही बंद झाल्या, असं कांबळी सांगत होते.

‘जगभरातील मनोरंजन क्षेत्राकडे पाहिलं तर यशाचा दर हा दहा टक्के असल्याचे पाहायला मिळते. दरवर्षी जवळपास ५० नाटकं येतात. गेल्या काही वर्षांमधील ट्रेंड पाहिला तर तोदेखील तसाच आहे. यावर्षी नोटाबंदीमुळे थोडी नाटकांची संख्या घटली. मराठी प्रेक्षक हा मार्केटिंगला भुलणारा नाही. त्यामुळे त्याला कुणीतरी सांगितलं की, हे नाटकं चांगलं आहे, तर त्यावर त्याचा विश्वास आहे. कर्णोपकर्णी चर्चेतून नाटकं चालतात. पण अशा प्रकारे नाटकाची प्रसिद्धी व्हायला थोडा वेळ लागतो. जवळपास १०-२५ प्रयोग झाल्यावर त्या नाटकाची लोकांमार्फत प्रसिद्धी व्हायला सुरुवात होते. पण जर काही नाटकं खरंच चांगली असतील तर खर्चाचा विचार करता ती एवढा कालावधी तग धरू शकत नाहीत. सध्याच्या घडीला एका प्रयोगाचा खर्च ७० हजार ते लाखभर रुपये एवढा होतो. त्यामुळे त्यांना एवढा वेळ तग धरता आला नाही तर ही नाटकं बंद पडतात. यामध्ये जे टिकू शकतात, त्यांची नाटकं चालतात. जर निर्माता नवीन असेल किंवा कालाकारांचा संच नवीन असेल, तर त्यांना चांगल्या तारखाही मिळत नाही. दुर्दैवाने मराठी नाटकांना फक्त शनिवार, रविवारी गर्दी होते. पण या तारखा जर नवीन निर्मात्याला मिळणार नसतील तर त्याचे नाटक चालणार नाही. नामांकित निर्मिती संस्था काही वेळा तोटा सहन करूनही तग धरू शकतात, असे चंद्रलेखा संस्थेची निर्मिती जबाबदारी सांभाळणारे आणि स्वत:ही काही नाटकांची निर्मिती करणारे अजित भुरे सांगत होते.

मराठी रंगभूमीवरील सुयोग ही नाटय़संस्था साऱ्यांच्याच परिचयाची. आतापर्यंत नानाविध नाटकांमुळे त्यांनी आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. ‘प्रत्येक नाटक हे आपलं नशीब घेऊन येतं, हे माझे वडील नेहमी सांगायचे. नाटक चांगलं असेल तर ते चालायला हवं. पण त्याचं सादरीकरण आणि ते किती काळ तग धरू शकतं, हे महत्त्वाचं ठरतं. काही चांगल्या नाटकांना सुरुवातीला तोटा सहन करावा लागतो. पण कालांतराने ती नाटकं आर्थिकदृष्टय़ा यशस्वी होतात. माझ्या मते संहिता चांगल्या असायला हव्यात. नाटकांचा नायक म्हणजे संहिता असते. एक कुटुंब जर एक हजार ते दीड हजार रुपये खर्च करून नाटक पाहायला आलं आणि त्यांनी जर वाईट नाटक पाहिलं तर ते दुसरं नाटक पाहण्याचं लवकर धाडस करणार नाहीत. नोटाबंदीनंतर ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाली आणि त्याचा फायदाही नाटकांना होत आहे, असं संदेश सांगत होते.

मराठी रंगभूमीवर काही समस्या भेडसावत असताना यावर उपाय काय करायला हवेत, हेदेखील या मान्यवरांनी सांगितलं. भुरे यांना वाटतं की, ‘मराठी नाटकांचं बिझनेझ मॉडेल बदलण्याची गरज आहे. नाटक कसं चालवता येऊ शकत यांचं योग्य नियोजन करणं जरुरी आहे. जर समविचारी निर्माते एकत्र आले आणि त्यांनी नाटकाची निर्मिती केली, तर कदाचित त्यांचा फायदा मिळण्याचे प्रमाण कमी होईल; पण तेवढी जोखीमही कमी होईल.’

‘युवा पिढीला जास्तीत जास्त संधी द्यायला हवी. मोठा नट नाटकात घेऊनही जर ते चालत नसेल तर काहीच करू शकत नाही. त्यामुळे युवा पिढीबरोबर काम केलं तर कमी बजेटमध्ये जास्त वेळ नाटक चालवता येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे, मी निर्माता संघाला विनंती करणार आहे की, नवीन निर्मिती संस्थांना शनिवार आणि रविवार हे दिवस नाटकांसाठी देण्यात यावेत आणि नामांकित संस्थांनी, कलाकारांनी सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आपले प्रयोग करावेत, असं संदेश भट सांगत होते.

‘मराठी रंगभूमीवर नवनवीन विषय येत आहेत, रंगभूमी सशक्त आहे. पण फक्त अनुदान मिळावं यासाठी नाटक करता कामा नये. अनुदानासाठी नाटय़निर्मिती करण्यापेक्षा प्रेक्षकांना जे अभिप्रेत आहे असं सकस नाटक प्रत्येक निर्मात्याने करायला हवं. नाटकांना पाठिंबा, प्रसिद्धी कायम मिळायला हवी. बऱ्याच आव्हानांचा मराठी रंगभूमी समर्थपणे सामना करत आहे. युवा कलाकार, निर्माते रंगभूमीवर बरेच प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहेत. मराठी नाटक करण्याचा ध्यास, जिद्द, नवनवीन विषय हाताळण्याची तयारी, यासर्व गोष्टींच्या जोरावर निर्माते प्रत्येक वर्षी चांगली कलाकृती आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत,’ असं प्रसाद यांना वाटतं.

कोणतं नाटक चांगलं चालू शकेल, हे कोणत्याही नटाला किंवा निर्मात्याला छातीठोकपणे सांगता येणार नाही. पण नाटकाचा आशय, विषय, अभिनय, अन्य बाजूंसह निर्मात्याला मिळणाऱ्या तारखा, प्रयोगांचे नियोजन, तोटा झाला तरी तग धरण्याची क्षमता यावर नाटकाचं भवितव्य अवलंबून असतं. बरीच आव्हानं पेलत मराठी रंगभूमी पाय रोवून उभी आहे. देशात फक्त मराठी रंगभूमीवरच सर्वाधिक ‘प्रयोग’ होताना दिसतात. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीची उत्तम सांगड आपल्याला पाहायला मिळते. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ, पडद्यामागील कलाकार आणि चाहत्यांनी आपली जबाबदारी चोख पाडली तर मराठी रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होताना दिसतील, अन्यथा काळाच्या ओघात मराठी रंगभूमीवर मरगळ कायम राहील.