सुहास शिरवळकरांच्या १९८० साली आलेल्या ‘दुनियादारी’ कादंबरीवरील चित्रपट सलग सात आठवडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे. सातव्या आठवडय़ातही राज्यातील १७५ चित्रपटगृहांमधून या चित्रपटाचे दिवसाला ४०० खेळ रंगत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने २०.५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला असून इतक्या कमी दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. याआधी महेश वामन मांजरेकर निर्मित ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे २२ कोटी रूपयांची कमाई केली होती. पुढच्या दोन ते तीन दिवसांत ‘दुनियादारी’ हा रेकॉर्ड मोडून सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरेल, असा विश्वास ‘झी टॉकीज’चे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट सर्वार्थाने लोकप्रिय मराठी चित्रपट ठरला आहे. ‘भाग मिल्खा भाग’, ‘शीप ऑफ थीसस’, ‘चेन्नई एस्क्प्रेस’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’, ‘मद्रास कॅफे’ असे बिग बजेट हिंदी चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होऊनही सलग सात आठवडे हाऊसफुल्ल गर्दी खेचणाऱ्या ‘दुनियादारी’ने हिंदी चित्रपटसृष्टीचेही लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या यशाचे श्रेय हे शिरवळकरांच्या कादंबरीलाच जाते, असे मत निखिल साने यांनी व्यक्त केले. ऐंशीच्या दशकात लिहिलेली या कादंबरीचा नायक श्रेयस तळवलकरची व्यक्तिरेखा ही कालातीत आहे. सध्याचे वातावरण हे अस्थिर आहे, इथे आर्थिक असुरक्षितता आहे, माणसा-माणसातील नात्यात असुरक्षितता आहे. अशा आजच्या वातावरणातही श्रेयसची व्यक्तिरेखा ही प्रचंड आशावादाचे प्रतिक म्हणून पाहिली जात आहे. कुठल्याही तत्वांवर, नीतीमूल्यांवर बोलत राहण्यापेक्षा आपल्या दैनंदिन कृत्यांतून आपले वेगळेपण जपू पाहणाऱ्या श्रेयसचे पात्र लोकांना आजच्या ‘सुपरहिरों’पेक्षाही जास्त जवळचा वाटतो आहे. म्हणूनच प्रेक्षक पुन्हा पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत, असे आपल्याला वाटत असल्याचे साने यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2013 रोजी प्रकाशित
‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’चा २२ कोटींचा विक्रम ‘दुनियादारी’ मोडणार?
सुहास शिरवळकरांच्या १९८० साली आलेल्या ‘दुनियादारी’ कादंबरीवरील चित्रपट सलग सात आठवडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे.
First published on: 31-08-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie duniyadari will break the collection of me shivajiraje bhosale boltoy