किती आले आणि किती गेले… पण २६ वर्षानंतरही मराठी माणसांच्या मनमंदिरात घर करून असलेला मराठी पाऊल पडते पुढे हा लोक संस्कृतीचा मराठमोळा आविष्कार त्याच जोशात आणि त्याच वेगात आजही कायम आहे. हा कलाविष्कार येत्या २८ डिसेंबरला आपला ३५०० वा विक्रमी प्रयोग मोठ्या धुमधडाक्यात करण्यासाठी सज्ज झालाय. परळच्या दामोदर सभागृहात हा विक्रमी सोहळा पार पडणार आहे.
मराठी पाऊल पडते पुढेच्या ३५००व्या विक्रमी प्रयोगाचा संगीतमय जल्लोष साजरा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कलारंजना मुंबईचे प्रमुख आणि मराठी पाऊल पडते पुढेचे निर्माता-दिग्दर्शक उदय साटम यांनी आपल्या संगीतमय संघर्षाची आणि कर्तव्याची गाथा मांडली. मराठी संस्कृतीचा वारसा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी मराठी पाऊल पडते पुढेची संकल्पना समोर आल्याचे साटम यांनी सांगितले. मराठी पाऊल पडते पुढे हा फक्त वाद्यवृंद नव्हता. अगदी कर्तव्याप्रमाणे आम्ही हा मराठमोळा संस्कृतीप्रधान कार्यक्रम सादर केल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
Year End 2017 Special : यंदाच्या वर्षी ‘या’ कलाकारांनी घेतला जगाचा निरोप
साटम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संस्कृती जतन सोहळ्याने गेल्या २६वर्षात महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात जाऊन आपला मराठी झेंडा फडकावला. एवढेच नव्हे तर गोव्यात १६५ प्रयोग करून एक नवा विक्रमही प्रस्थापित केला. नव्वदच्या दशकात मराठी रंगभूमीवर मराठी नाटकांबरोबर मराठी वाद्यवृंद हा एकमेव प्रकार सुरू असताना साटम यांनी आपल्या वाद्यवृंदात परंपरा जपणाऱ्या लोकनृत्याचीही सांगड घातली आणि गेली २६ वर्षे सातत्याने ते आपले संगीतमय कर्तव्य यशस्वीपणे पार पाडत आहेत.
Year End Special 2017: या १५ सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात कोणालाही बोलावले नाही
गेल्या अडीच दशकात प्रयोगांचे शतकामागून शतक ठोकणाऱ्या मराठी पाऊल पडते पुढेने मराठी माणसांची आवडनिवड लक्षात ठेवत काळानूसार आपल्या कार्यक्रमात बदल करत आपले नाते आणखी घट्ट केले. लोकांचे घरबसल्याच मनोरंजन होत असल्यामुळे मराठी रंगभूमीवरील प्रयोगांची संख्या दिवसेंदिवस रोडावत असतानाही मराठी पाऊल पडते पुढेने आपल्या वैविध्यतेमुळे मराठी माणसांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यासाठी जबरदस्त संगीतमय संघर्ष केला आहे. नव्या पीढीला आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, मनात गोडी निर्माण व्हावी म्हणून ३५००व्या प्रयोगानंतरही हा संगीतमय सांस्कृतिक सोहळा असाच सुरू ठेवला जाणार असल्याही ग्वाही उदय साटम यांनी दिली. आतापर्यंत अनेक अडचणी आल्या. कधी त्या अडचणी आर्थिक होत्या तर कधी आयोजनाच्या, पण आम्ही कधीच डळमळलो नाही. ना कधी हार मानली. येईल त्या आव्हानांना धैर्याने तोंड दिले. त्यामुळेच मराठीचे प्रयोग सुरू राहू शकले आणि असेच नॉनस्टाप पुढेही सुरू राहतील, असा विश्वासही साटम यांनी व्यक्त केला.