करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. अशातच मालिक आणि चित्रपटांचे चित्रीकरण देखील थांबवण्यात आले होते. पण आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासही सरकारने परवानगी दिली आहे. पण त्यासाठी सरकारने काही नियम आखले आहेत. या सर्व नियमांचे पालन करत मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे लवकरच चाहत्यांना त्यांच्या आवडत्या मालिका पुन्हा पाहायला मिळणार आहेत.
झी मराठीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान यांच्या भूमिका आहेत. तसेच मालिकेत बबड्या आणि शूभ्राला पुन्हा पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.
नुकताच झी मराठीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. तसेच मालिका १३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. पण या वेळी मात्र शूभ्राच्या साध्याभोळ्या सासूबाई एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये लाडक्या बबड्याची आई, म्हणजेच शुभ्राची सासू बबड्याला ओरडताना दिसत आहे. इतकच नव्हे तर त्या ‘मी सुभ्राची सासू नाही तर आई आहे’ असे बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आता मालिकेमध्ये एक वेगळे वळण आले आहे. ते पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.
तसेच हा व्हिडीओ शेअर करत “सासू झाली आई, आता बबड्याची खैर नाही. अग्गंबाई सासूबाई १३ जुलैपासून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला असे कॅप्शन देण्यात आले आहे.