मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाची म्हणजे सोहम बांदेकर याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोहम एका नव्या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करत आहे. त्यामुळे त्याच्या या आगामी मालिकेविषयी आणि एकंदरीतच त्याच्या भूमिकेविषयी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सोहमची होत असलेली ही चर्चा पाहून आता त्याच्या भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे.

सोहम लवकरच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे. अलिकडेच या मालिकेचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आणि सोहमच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्याच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलंच कुतुहल निर्माण झालं. नवे लक्ष्य या मालिकेत सोहम एका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असून पीएसआय जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका तो वठवणार आहे.

“पोलिसांचं कार्य शब्दात मांडता येणारं नाही. त्यामुळे या रिअल हिरोजना साकारणं अतिशय आव्हानात्मक आहे. सीनसाठी वर्दी चढवल्यानंतर एक वेगळंच स्फुरण चढतं. या वर्दीची एवढी ताकद आहे की थकवा अजिबात जाणवत नाही. मी पीएसआय जय ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. पीएसआय जयला लहानपणापासूनच पोलिसांच्या वर्दीचं पॅशन आहे. स्त्रियांचा प्रचंड आदर असलेला, वडिलांचं चॅलेंज स्वीकारुन एमपीएससी टॉप करणारा असा हा जय. जयचं त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच त्याच्या नावातही तो आईचं नाव लावतो. खऱ्या आयुष्यातही मला माझी आई खूप जवळची आहे. आई-बाबा दोघांचाही खंबीर पाठिंबा असल्यामुळे मी हे आव्हान स्वीकारु शकलो”, असं सोहम म्हणाला.

वाचा : वडिलांच्या पावलावर पाऊल! आदेश बांदेकरांच्या मुलाचं कलाविश्वात पदार्पण

पुढे तो म्हणतो, “गेले वर्षभर मी माझ्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याचा उपयोग जयची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला होतोय. उदय सबनीस, शुभांगी सदावर्ते, अमित डोलावत, अभिजीत श्वेतचंद्र अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. लक्ष्यवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम ‘नवे लक्ष्य’लाही मिळेल याची मला खात्री आहे.”

छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘ललित २०५’ या मालिकेच्या निर्मितीची जबाबदारी सोहमने यशस्वीरित्या पार पाडली असून आता तो स्वत: अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. त्यामुळे ‘नवे लक्ष्य’ ही सोहमची पहिलीचं मालिका आहे. या भूमिकेसाठी तो प्रचंड उत्साही आहे. विशेष म्हणजे या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्याने वजनदेखील कमी केल्याचं म्हटलं जात आहे.