कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. चिनी अभिनेत्री झू झू सोबतच या चित्रपटातून आणखी एक चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तो चेहरा म्हणजे अभिनेत्री इशा तलवार. या चित्रपटातील लहानशी भूमिकासुद्धा तिला प्रकाशझोतात आणून गेली. इशाने ‘ट्युबलाइट’मध्ये मायाची भूमिका साकारली आहे. सलमान आणि सोहेलच्या भूमिकांमध्ये ही मायाही तितकीच महत्त्वाची होती असं म्हणायला हरकत नाही. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये इशा फार नावाजली गेली आहे. याशिवाय तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

२२ डिसेंबर १९८७ रोजी जन्मलेली इशा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. तिचे बरेच फोटो चर्चेतही आहेत. मुख्य म्हणजे तिच्या चाहत्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. आपल्या ग्लॅमरस अदांनी अनेकांना घायाळ करणारी ही अभिनेत्री सैफ अली खानच्या आगामी ‘शेफ’ या चित्रपटातही झळकणार आहे. मॉडेलिंग विश्वातून या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या इशाने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलं आहे. ‘जस्ट डान्स’ या रिअॅलिटी शोच्या प्रमोशनल व्हिडिओमध्येही इशा हृतिकसोबत झळकली होती.

इशाचं कुटुंबंही चित्रपटसृष्टीसोबत जोडलं गेलं आहे. ‘दैनिक भास्कर’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इशाचे आई- वडील बोनी कपूर यांच्या कंपनीत दिग्दर्शक आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहतात. इशा तलवार हे नाव ग्लॅमर आणि चित्रपट वर्तुळासाठी नवीन नाही. ‘थात्ताथिन मरयात्हू’, ‘आय लव्ह मी’, ‘ठिल्लू मुल्लू’, ‘नाले’ या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.