‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असणारी अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावते आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुषमान खुरानासोबत ती पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही एका नव्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्याची संधा मिळतेय. पण, गेल्या काही दिवसांपासून आयुषमानसोबतच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीपेक्षा परिणीची रिअल लाइफ केमिस्ट्री जास्त चर्चेत आली आहे. यशराज फिल्म्समधील एका सहाय्यक दिग्दर्शकाला परिणीती डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून बी- टाऊनमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं. याविषयीच आता खुद्द परिणीतीने तिचं मौन सोडत चरित देसाईसोबतच्या नात्याविषयी वक्तव्य केलं आहे.
‘एचटी’ला दिलेल्या मुलाखतीत परी म्हणाली, ‘तुम्हाला हे विनोदी वाटेल पण काही महिन्यांपूर्वी मी संजना नावाच्या एका मैत्रिणीसोबत दुबईला गेले होते. जेव्हा मी परत आले तेव्हा चक्क माझं आणि संजनाचं नातं मैत्रीपेक्षाही जास्त असल्याचं म्हटलं जात होतं. किंबहुना यासंबंधीचा एक लेखही छापून आला होता. त्याच्याच जवळपास एक महिन्यानंतर या (चरित देसाईच्या) चर्चेनं तोड वर काढलं.’ असं परिणीती म्हणाली. इतकंच नव्हे, तर ‘या साऱ्याची आता मला सवय झाली आहे. मी या सर्व विषयांवर काहीच प्रतिक्रिया देत नाहीये कारण, हे माझं खासगी आयुष्य आहे आणि ते मी खासगीच ठेवणार आहे. त्याबद्दल उघडपणे काहीही बोलणं मला आवडत नाही.’ असं परिने स्पष्ट केलं.
‘मनिष शर्मा, संजना अशी बरीच नावं माझ्याशी जोडली गेली आहेत हे मला ठाऊक आहे. हो.. या सर्व व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत. त्याने काय फरक पडतो. मी इथे फक्त माझ्या कामाविषयीच बोलणार आहे’, असं म्हणत परिणीतीने चरित प्रकरणावर तिची ठाम भूमिका मांडली.
दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून परिणीती आणि चरित एकमेकांना जास्त वेळ देत असल्याचं म्हटलं जात होतं. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मैत्रीपासून सुरु झालेलं त्यांचं हे नातं आता मैत्रीपलीकडे गेल्याच्याही चर्चा रंगल्या. चरितसोबत नाव जोडलं जाण्यापूर्वी परिणीती दिग्दर्शक मनिष शर्मा याला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.