आपल्या सुर्यमालेतील मंगळ व गुरू ग्रहादरम्यान सापडलेल्या एका छोट्या ग्रहाला भारतीय शास्त्रीय संगीतामधील दिग्गज गायक पंडीत जसराज यांचे नाव देण्यात आले आहे. अशाप्रकारे संगीत क्षेत्रातील एखाद्या भारतीयाचे नाव खगोलीय वस्तूला देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियनने (आयएयू) मंगळ व गुरुदरम्यान ११ नोव्हेंबर २००६ रोजी एक छोटा ग्रह शोधून काढला. या ग्रहाला २००६ व्हीपी३२ (क्रमांक – ३००१२८) असे तांत्रिक (टेक्निकल) नाव देण्यात आले होते. याच ग्रहाचे नामकरण करुन त्याला आता ‘पंडीत जसराज’ असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांनी पीटीआयला माहिती दिली. ‘आयएयूने २३ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील औपचारिक घोषणा करत या नावाची नोंद केली,’ असं दुर्गा यांनी सांगितलं.
पद्म विभूषण असणाऱ्या जसराज यांच्या नावाचा आता अशा काही मोजक्या संगीतकारांमध्ये समावेश झाला आहे ज्यांचे नाव खगोलीय वस्तूला देण्यात आले आहे. रोमन संगीतकार मोझार्ट, जर्मन संगीतकार बीथोव्हेन आणि इटालियन संगीतकार लुसियानो पावारोटी यांचीही नावे या आधी अशाप्रकारे ग्रहांना देण्यात आली आहेत.
याबद्दल बोलताना पंडित जसराज यांनी ‘देवाच्या कृपेने मला हा सन्मान मिळाला आहे,’ असं मत व्यक्त केलं आहे. जसराज हे भारतीय शास्त्रीय संगीतामधील निपुण गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीता क्षेत्राची सेवा करण्यासाठी वाहून घेतले आहे. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्याचा आवाज स्वर्गीय आहे,’ असं आयएयूने म्हटलं आहे.
लवकरच हा नवा पंडीत जसराज नावाचा ग्रह आणि त्याची माहिती आयएयूच्या साईटवर दिसणार आहे. या ग्रहाचे टेक्निकल नाव ३००१२८ असेच असले तरी तो ‘पंडीत जसराज’ नावानेच ओळखला जाणार आहे. हा आकडाही खास आहे. कारण पंडीत जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला आहे. त्यांची जन्मतारीख उलट क्रमाने देऊन या ग्राहाला टेक्निकल नाव देण्यात आले आहे.