दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या लूकने प्रेक्षकांची मनं जिंकते यात वाद नाही. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘घुमर’ गाण्यातही तिच्या अशाच अदा पाहायला मिळाल्या. वजनदार लेहंगा, पारंपरिक दागिने, चेहऱ्यावर झळकणारे तेज या सर्व गोष्टींमुळे दीपिकाचे सौंदर्य अधिकचं खुलले. ‘घुमर’वर तिने धरलेला ठेकाही अनेकांना भावला. या गाण्यामुळे एका प्रश्नाने अनेकांच्याच मनात घर केलं. ‘घुमर’ गाण्यात मध्यभागी बैठकीवर बसलेल्या आणखी एका राणीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे दीपिकाप्रमाणेच तिच्यावरही अनेकांच्याच नजरा खिळल्या.

गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये, चेहऱ्यावर गंभीर भाव घेऊन बसलेली ‘ती’ आहे तरी कोण हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. या प्रश्नाचे उत्तर ‘भन्साळी प्रॉडक्शन एफसी’ या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आले आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे अनुप्रिया गोएंका. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’मध्ये अनुप्रिया महाराजा रावल रतन सिंहच्या पहिल्या पत्नीच्या म्हणजेच ‘राणी नागमती’च्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्या भूमिकेविषयी फार काही माहिती उघड करण्यात आलेली नाही. पण, अनुप्रियाच्या चाहत्यांमध्ये मात्र कुतूहलचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अनुप्रियाने आतापर्यंत विविध चित्रपट आणि लघुपटांमध्येही काम केले आहे. २०१३ मध्ये तिने तेलगु चित्रपटाच्या माध्यमातून या क्षेत्रात पदार्पण केले होते. मॉडेलिंग क्षेत्रातही ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत ‘पाठशाला’, ‘बॉबी जासूस’, ‘ढिशूम’ या चित्रपटांमधून ती झळकली होती. अनुप्रियाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिच्या नावाचीही बरीच चर्चा आहे. त्यातही ‘पद्मावती’च्या निमित्ताने इतक्या मोठ्या निर्मिती संस्थेअंतर्गत आणि तितक्याच ताकदीच्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी तिच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा