गेल्या काही दिवसांपासून करोनाने थैमान घातला आहे. करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. आता छोट्या पडद्यावरील अभिनेता नमिष तनेजाला देखील करोना झाल्याचे समोर आले आहे.

नमिष सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदिवला गेला होता. तेथे गेल्यानंतर त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे नमिषला मालदिवमधील रिसॉर्टमध्येच क्वारंटाइन करण्यात आले आहे. नमिषसोबत त्याची पत्नी आंचल शर्मा देखील मालदिवला गेली होती. तिला देखील क्वारंटाइन करण्यात आले होते.

आणखी वाचा : ‘एक ते दोन महिन्यांमध्ये…’, दयाबेनच्या वापसीवर असित मोदींचा मोठा खुलासा

नमिषच्या पत्नाचा क्वारंटाइनचा काळ संपल्यानंतर ती भारतात परतली आहे. पण नमिष मात्र अजूनही तेथे आहे. नमिषने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

नमिषने इनस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘सर्वांना माझा नमस्कार, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मालदिवमध्ये आहे आणि माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी योग्य ती काळजी घेतल्यानंतरही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया मास्क लावा आणि सॅनिटायझरचा वापर करा. सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. काळजी घ्या आणि मी लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.