लॉकडाउनच्या काळात घरी बसून काय कराव असा प्रश्न पडलेल्यांसाठी ‘रामायण’ व ‘महाभारत’ या जुन्या मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर आता ‘शक्तिमान’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणावा अशी जोरदार मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे. ट्विटरवर #Shaktiman ट्रेण्ड होऊ लागला आहे.

‘शक्तिमान’ कोण हे माहिती नाही असा व्यक्ती सापडणे तसे दुर्मिळच. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वच शक्तिमानचे चाहते होते. ‘शक्तिमान’ ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकात एवढी प्रसिद्ध होती की, ‘शक्तिमान’ ज्या पद्धतीने उडतो अगदी तसंच उडण्याचा प्रयत्न अनेक मुलं करायची. शक्तिमानची क्रेझ आजही तितकीच आहे. त्यामुळे ही मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

लॉकडाउनमुळे २१ दिवस घरीच बसावे लागणार असल्याने विविध वाहिन्या व ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध कल्पना अंमलात आणल्या जात आहेत. त्यामुळे आता ‘शक्तिमान’ची मागणी पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.