नवे माध्यम, नवी शैली…

नूपुर अस्थाना दिग्दर्शित ‘द कपल’ या कथेत श्रीया धनवर्थी आणि प्रियांशू पैन्युली यांची प्रमुख भूमिका असून टाळेबंदीतील नोकरी, लग्न आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारी ही कथा आहे.

|| गायत्री हसबनीस

करोना, त्यामुळे लागलेली टाळेबंदी आणि त्याचा सर्वांच्याच जीवनावर झालेला परिणाम याबद्दल भाष्य करणारे वास्तवादी चित्रण दोन वर्षांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘अनपॉझ्ड’ या कथामालिकेतून दाखवण्यात आले होते. पाच दिग्दर्शकांच्या वेगळ्या कथांमधून ही मालिका साकारली होती. त्याचाच दुसरा भाग पुन्हा एकदा पाच नानाविध कथा सांगणाऱ्या वेबमालिकेच्या रूपात ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नूपुर अस्थाना, रूचिर अरुण, नागराज मंजुळे, अय्यपा के.एम आणि शिखा माकन यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या ‘अनपॉझ्ड – नया सफर’ या सीझन २ ला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानिमित्ताने या मालिकेतून चौथ्या भागात दाखवण्यात आलेल्या ‘गोंद के लड्डू’ या कथेतील कलाकारांशी संवाद साधता आला…

टाळेबंदीच्या काळातील अनेक समस्या, ताणतणाव आणि नकारात्मक परिस्थिती यावर उघडपणे बोलण्यापेक्षा त्या काळातही लोकांकडून समाजाकडे आलेली सकारात्मक आणि आशावादी शक्ती, माणसांच्या प्रेरणादायी गोष्टी आणि माणुसकी दाखवणाऱ्या विषयांवर आधारित पाच कथा सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘अनपॉझ्ड – नया सफर’ वेबमालिकेत केला गेला आहे, असा एकत्रित विचार या वेबामालिकेच्या निमित्ताने एकत्र आलेल्या पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी मांडला आहे,  असे मत दिग्दर्शकांनी व्यक्त केले आहे.

नूपुर अस्थाना दिग्दर्शित ‘द कपल’ या कथेत श्रीया धनवर्थी आणि प्रियांशू पैन्युली यांची प्रमुख भूमिका असून टाळेबंदीतील नोकरी, लग्न आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारी ही कथा आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित आणि अभिनित केलेल्या ‘वैकुंठ्य’ या भागात अति-आवश्यक सेवा देणाऱ्या एका कामगाराची गोष्ट आहे. ‘वॉर रूम’ या अय्यपा के. एम यांनी दिग्दर्शित केलेल्या कथेत गीतांजली कुलकर्णीने कोविड वॉर रूममध्ये कार्यरत असलेल्या संगीता वाघमारेंची भूमिका केली आहे.  ‘टीन टीगाडा’ या कथेचे दिग्दर्शन रूचिर अरुण यांनी केले असून साकिब सलीम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या कथेत पडक्या कारखान्यात मोठी लूट करणाऱ्या तीन चोरांची गोष्ट पाहायला मिळते. तर ‘गोंद के लड्डू’ या कथेत नीना कुळकर्णी, लक्षवीर सरन यांची यात प्रमुख भूमिका आहे. एका डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून एकट्या राहणाऱ्या आईकडून तिच्या मुलीपर्यंत पोहचत असलेल्या डिंकाच्या लाडवांची, मायेच्या गोडीची ही गोष्ट आहे. 

‘गोंद के लड्डू’ ही नावाप्रमाणेच खूप गोड गोष्ट आहे ज्यात नात्यांचा अनोखा मेळ आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या एकट्या स्त्रीची ही कथा आहे जिची मुलगी दिल्लीत राहते. सध्या महामारी चालू आहे त्यातून काही गोष्टी स्वत:हून आपण स्वाभाविकरीत्या करू शकत नाही. आपल्याला लोकांची मदत त्यासाठी घ्यावी लागते यावरच बेतलेली ही गोष्ट आहे, असे अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सांगितले.  ‘गोंद के लड्डू’ म्हणजेचे डिंकाचे लाडू ज्याबद्दल आपल्यालाही मोठं अप्रूप असतं. दिग्दर्शिका शिखा माकन हिने या कथेत अद् भुत क्षण रचले आहेत. या भागात माझ्यावर चित्रित झालेले एक दृश्य आहे, ज्यात मी डिंकाचे लाडू वळायला घेते तेव्हा लाडू वळायच्या अगोदर त्या डिंकाकडे मी एक नजर टाकते. त्याच्याकडे पाहात असताना मला शिखाने सांगितले होते की त्यावेळी आनंद, आश्चर्य, समाधान आणि प्रेम हे सर्वच भाव चेहऱ्यावर एकवटायला हवेत. आणि खरोखर तो क्षण इतका सुंदर टिपला आहे की मला संपूर्ण कथेतील ते दृश्य अत्यंत आवडते, असेही नीना कुळकर्णी यांनी सांगितले.

‘‘करोनामुळे लागलेली टाळेबंदी ही सुरुवातीला आपल्या सर्वांसाठीच फार नवीन होती, पण आता अक्षरक्ष: चित्र पालटले असून लोकांनी टाळेबंदीतील जीवनशैलीशी स्वत:ला जुळवून घेतले आहे. पहिल्या भागातील टाळेबंदीचे चित्रीकरण हे काहीसे ताजे होते त्यातील कथा ताज्या होत्या, पण आता दोन वर्षांनंतर लोक परिस्थितीचा धैर्याने सामना करू लागले आहेत. याच बदलावर आधारित कथा प्रेक्षकांना ‘अनपॉझ्ड – नया सफर’मधून पाहायला मिळणार आहे. पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागातील वेगळेपण काय असेल? तर विषय तोच पण वैफल्यातून बाहेर येत करोनातील परिस्थितीला धीराने सामोरे जाणाऱ्या माणसांच्या कथा यात आहेत, असे लेखिका – दिग्दर्शिका शिखा माकन यांनी सांगितले. आम्ही सुरुवातीपासूनच ठरवले होते की या नवीन सीझनमध्ये सकारात्मक आणि आशावादी चित्र दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करायचा. त्यामुळे जे घडलंय ते न दाखवता वर्तमानात काय चांगलं सुरू आहे त्यातला संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तर या कथेत कुरिअर सेवा देणाऱ्या एका कंपनीतील डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता लक्षवीर सरनच्या मते या महामारीत आशावादी राहणं हाच एकमेव मार्ग असल्याची जाणीव करून देणारी अशी ही रोहनची व्यक्तिरेखा आहे.  त्याची नोकरी कधीही जाऊ शकते अशी भीती त्याला आहे, त्याचाही एक परिवार आहे, पत्नी आहे. कुरिअर पोहोचवताना त्याच्या हातून चूकही घडते त्यामुळे भांबावलेल्या रोहनला फक्त पत्नी गीतचेच सहकार्य मिळते. काहीशी त्रेधातिरपिट त्याच्या आयुष्यात असताना नशिबात काय पुढे लिहून ठेवलंय याचाही पत्ता नसलेली, एकूणच पिचलेली अशी ही  व्यक्तिरेखा साकारताना त्यातून जो सकारात्मक संदेश दिला गेला आहे तो व्यक्तिश: मलाही खूप प्रसन्न करून गेला, असेही त्याने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New medium unposed story series directors the series came to fruition akp

Next Story
शोबाजीही नाही…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी