‘सरस्वती’ मालिकेमध्ये बऱ्याच दिवसांपासून अनपेक्षित घटना घडत आहेत. सरस्वतीची हत्या, राघवने दुर्गालाच सरस्वती समजणे, देविकाचे अचानक वाडा सोडून जाणे, या सगळ्या घटनांमुळे मालिकेला वेगळीच कलाटणी मिळाली. विद्युलने आजवर भुजंगच्या मदतीने रचलेली सगळी षड्यंत्र यशस्वी झाली आहेत. पण, दुर्गाचा बेधडक आणि बिनधास्त स्वभाव विद्युलवर भारी पडला. तिच्या प्रत्येक कटकारस्थानांना दुर्गाने उलटून लावले. या सगळ्या घटनांमध्ये प्रेक्षकांना मालिकेतील आणखी एक अनपेक्षित वळण पाहता येणार आहे. कारण, सर्वांचीच लाडकी सरस्वती म्हणजेच मोठ्या मालकांची ‘सरू’ मालिकेमध्ये परतणार आहे.

राघव आणि सरस्वती पुन्हा एकत्र येणार का, विद्युल कोणती नवी खेळी खेळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रेक्षकांना मिळणार आहेत. मालिकेत सध्या सुरु असणाऱ्या कथानकानुसार भैरवकर वाड्यावर बऱ्याच गोष्टी घडत असतानाच, देविका वाडा सोडून गेली. विद्युल आणि भुजंग कागदपत्रांवर हव्या असलेल्या स्वाक्षरीसाठी सरस्वतीप्रमाणे दिसणाऱ्या दुर्गाला भैरवकर वाड्यावर आणले. याचदरम्यान, दुर्गाला सरस्वतीबद्दल सगळी माहिती मिळू लागली. सरस्वती कशी होती, तिचा स्वभाव कसा होता, तिचे आणि राघवचे नाते कसे होते हे सगळे तिला समजले.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

त्याचबरोबर दुर्गाला विद्युल आणि भुजंगच्या कारस्थानाचाही सुगावा लागतो. त्यामुळे ती या दोघांचे काहीच ऐकत नाही, त्यांचे कामही करत नाही आणि यामुळेच भुजंग-विद्युल तिला मारण्याचा कट रचतात. हे सुरु असतानाच वाड्यावर दुर्गाच्या अक्का येतात. आता अक्का आणि दुर्गा मिळून विद्युल, भुजंगचा कट कसा उधळून लावतील हे बघण्यासारखे असेल.