जर तुम्ही ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक धमाकेदार बातमी आहे. साराभाईची ही वेब सीरिज आधीच्या मालिकेपेक्षाही मजेशीर असणार आहे. ‘हॉटस्टार’ने नुकताच साराभाईच्या टीमचा एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये साराभाई कुटुंबीय दुसऱ्या सिझनला योग्य नाव काय द्यायचं यावर भांडताना दाखवण्यात आले आहे. इंद्रवर्धनचे जोक्स, रोसेशच्या कविता, मायाचा क्लास, मोनिशाचे मध्यमवर्गीय वागणे तर दुष्यंत आणि काकांच तसंच त्रासदायक वागणं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्यातले टायमिंग पूर्वीसारखेच वाटते यात काही शंका नाही. पण त्यांच्या या भांडणात घरातला समंजस साहिल मात्र पेचात पडल्याचं दिसून येतंय.

घरातल्या प्रत्येक सदस्याला त्याने सुचवलेलं नावाच कसं योग्य आहे हे सांगायचे होते. घरातल्यांच्या वादाला कंटाळून साहिलने शेवटी व्हिडिओमध्ये २१ एप्रिलपर्यंत प्रेक्षकांनाच योग्य नाव सुचवण्याची विनंती केली.

गेल्या वर्षी जून महिन्यात ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’च्या संपूर्ण टीमने एक गेट-टुगेदर केले होते. त्यांच्या या गेट-टुगेदरचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मालिकेचा नवीन सीझन येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आधीच्या सीझनप्रमाणेच हाही सीझन सतीश शाह, रत्ना पाठक शाह, सुमित राघवन, रुपाली गांगुली, राजेश कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अरविंद वैद्य हे मधुसूदन फुफा आणि देवेन भोजानी दुष्यंतच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. या नवीन सीझनमध्ये मोनिशा आणि साहिलचा एक मुलगाही दाखवण्यात आला आहे.