गेल्या काही वर्षांत छोटय़ा पडद्याशी बॉलीवूडमधील अनेक मोठी नावं जोडली गेली. विशेषत: संजय लीला भन्साळींसारखा दिग्दर्शक असेल, अनुराग कश्यप, अनुराग बासू, महेश भट्ट ही नावं निर्माता-दिग्दर्शक म्हणून टेलिव्हिजनशी जोडली गेली आहेत. बॉलीवूडमधून छोटय़ा पडद्यावर येणाऱ्या अतिशय प्रतिभावान दिग्दर्शकांच्या मांदियाळीत ‘कल हो ना हो’सारख्या चित्रपटाने यशस्वी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या निखिल अडवाणीचे नाव सामील होते आहे. बंडखोर, प्रतिभावान, हरहुन्नरी अशी ओळख असलेला हा दिग्दर्शक छोटय़ा पडद्यावर येताना त्याच्या विचारांना साजेल असाच भव्यदिव्य शो घेऊन येतो आहे. इस्रायली दिग्दर्शक गिदेन राफ यांच्या ‘हाटुफिम’ या शोचा रिमेक ‘प्रिझनर्स ऑफ वॉर – बंदी युद्ध के’ या नावाने ‘स्टार प्लस’ वाहिनीवर दाखल होतो आहे. इस्रायली शोचा रिमेक करताना निखिल अडवाणीने त्याला कारगिल युद्धाची पाश्र्वभूमी देत या युद्धाचे खरे बंदी कोण? आपले सर्वस्व मागे सोडून युद्ध करणारे सैनिक की त्यांची शेवटपर्यंत वाट पाहणारे त्यांचे कुटुंबीय? असा वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘हाटुफिम’ हा इस्रायली शो सध्या हॉलीवुडमध्ये ‘होमलँड’ नावाने गाजतो आहे, पण ‘होमलँड’शी कु ठल्याही प्रकारे नाते जोडायला दिग्दर्शक म्हणून निखिल तयार होत नाही. आपले एटीएस अधिकारी, आपली गुप्तहेर यंत्रणा कुठेही, कधीही मशीनगन्स घेऊन लढत नाही, मोठमोठय़ा संगणकांवर काम करत नाही. ‘डी डे’मध्ये मी दाखवलं होतं. आपला गुप्तहेर हा कुठेतरी रस्त्याच्या कोपऱ्याला बसलेला पानवाला असतो किंवा गल्लीत नेहमी फिरणारा कोणीतरी सामान्य माणूस असतो. अर्थात, ही माहिती मी या गुप्तहेरांबरोबर, ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांबरोबर राहून, त्यांच्याशी सतत चर्चा करून मिळवलेली आहे. त्यामुळे मूळ इस्रायली शो प्रामाणिक असून त्याचाच आधार या मालिकेसाठी घेतला असल्याचे निखिलने स्पष्ट के ले. हिंदी चित्रपटाइतक्याच भव्य प्रमाणात आणि तेच तंत्र वापरून ही मालिका चित्रित करण्यात आली आहे. कारगिल युद्धाची पाश्र्वभूमी या मालिकेला असली तरी त्याचा गाभा हा मानवी नातेसंबंधच असल्याचे त्याने सांगितले. ‘नीरजा’ चित्रपटात विमानाचे अपहरण ही मुख्य कथा नाही, ती कथेची पाश्र्वभूमी आहे. नीरजा आणि तिच्या आईचे नाते या चित्रपटाच्या केंद्रस्थानी होते. ‘एअरलिफ्ट’ची निर्मिती माझी होती. त्यातही विमानातून कुवेतमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्याची घटना ही शेवटी येते. मात्र त्या घटनेच्या निमित्ताने त्या काळातील अनेक सामाजिक, राजकीय घटनांचे संदर्भ चित्रपटात आहेत. त्याच धर्तीवर ‘बंदी युद्ध के’मध्येही कारगिलच्या निमित्ताने खरे युद्धाचे बंदी कोण असतात? सीमेवर लढणारे सैनिक की मागे उरलेले त्यांचे कुटुंब हा विषय मध्यवर्ती ठेवून कथा रचली आहे. कारगिलच्या युद्धात पाकिस्तानात बंदी झालेले दोन भारतीय सैनिक १७ वर्षांनंतर मायदेशात परततात. तोवर त्यांच्या कुटुंबाचे काय होते? या दोन्ही सैनिकांच्या पत्नी १७ वर्षे त्यांच्यासाठी वाट पाहतात. तुम्ही-आम्ही १७ तासही कोणासाठी थांबू शकत नाही. तिथे आपल्या पतीचे काय झाले? याची कणभरही माहिती नसताना त्या त्यांच्या परतण्याची वाट पाहतात, ही माझ्या मते देशभक्तीची परिसीमा आहे. माझ्या मालिकेच्या नायिका आहेत त्यांना कोणीही दुसऱ्या विवाहासाठी अडवलेले नाही, मात्र तरीही त्या आपापल्या नवऱ्यांसाठी थांबल्या आहेत.. का? या एका प्रश्नावरून कथा रचली सांगणारा हा दिग्दर्शक फक्त तेवढा कौटुंबिक-भावनिक धागा पकडून थांबणे शक्य नाही.

‘डी डे’मध्ये गुप्तहेरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या निखिल अडवाणीने त्याही वेळी दोन्ही देशांचे सरकार, राजकीय खेळीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय, दाऊदसारख्या गुंडाला भारतात आणणे या यंत्रणेला शक्य आहे हे दाखवत व्यवस्थेतील अनेक कच्च्या दुव्यांवर भाष्य केले होते. याही मालिकेत दिग्दर्शक म्हणून त्याने ते स्वातंत्र्य घेतले आहे. आज आपण राष्ट्रवाद कोणता? यावर वाद घालतो आहोत. माझ्या मालिकेतील नायक एक मुसलमान आहे, दुसरा सरदार आहे. कुठे राहिला तुमचा राष्ट्रवाद? तुम्ही बहुमताच्या बाता करता, इथे ते दोघेही अल्पसंख्याकांचेच प्रतिनिधित्व करतात. त्यातल्या एकाच्या तोंडी वाक्य आहे, ‘मी हवाईदलाचा सैनिक आहे तरीही तुम्ही माझ्यावर संशय घेता.. ’ तो मुसलमान आहे म्हणून १७ वर्षांनी तो परतल्यावरही त्याच्या कर्तव्यनिष्ठेवर बोट ठेवले जाते, असे अनेक मुद्दे जे आपल्या कलाकृतीतून यायला हवेत ते मांडण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे निखिलने सांगितले. हिंदी चित्रपटातील अनेक प्रथितयश दिग्दर्शक मालिका निर्मितीत उतरले आहेत. याआधी आशुतोष गोवारीकर, अनुराग कश्यप यांनी टीव्हीसाठी मालिका केल्या, मात्र त्यांनी प्रत्येक भागाचे दिग्दर्शन केले नाही. ‘स्टार प्लस’वरची ‘बंदी युद्ध के’ ही मालिका पूर्णपणे निखिलने दिग्दर्शित केली आहे. टेलिव्हिजन हे माध्यम चित्रपटापेक्षा वेगळी आहे. इथे तुम्हाला प्रत्येक एपिसोडसाठी मॅरेथॉन करावी लागते हे मान्य करत असतानाही ही मालिका फक्त निखिल अडवाणीचीच असू शकते, इतका ठाम विश्वास प्रेक्षकांमध्ये निर्माण होईल अशी असली पाहिजे आणि याबाबतीत आपण खूप आग्रही आहोत, असे निखिल म्हणतो. दिग्दर्शन हे आपलं वेड आहे, ध्यास आहे हे पटवून देण्यासाठी त्याने हॉलीवूड दिग्दर्शक स्टॅनली क्युब्रिक यांचा किस्सा सांगितला. स्टॅनली क्युब्रिकबरोबर टॉम क्रुझ चित्रपट करतो आहे हे कळल्यानंतर स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी टॉमला फोन केला होता. ‘स्टॅनली वेडा माणूस आहे. तो माझा गुरू आहे, पण तो तुला वेडा करेल. त्याच्याबरोबर काम करणं सोपं नाही,’ असा सल्ला टॉमला दिला. टॉमनेही आपल्याला जमेल सगळं असं म्हणत स्टीव्हनच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी त्यांनी ५१ शॉट्सचा सीन केला. त्यांनी ते सगळे ५१ शॉट्स एका दिवसात पूर्ण केले. टॉमने त्या दिवशी स्टीव्हनला फोन करून विचारलं की, ‘तू वेडा आहेस का? आम्ही एका दिवसात ५१ शॉट्सचा सीन पूर्ण केला आहे. तू असं का सांगितलंस त्यांच्याबद्दल?’ दुसऱ्या दिवशी टॉमला फक्त एकच सीन करायचा होता. त्याला फक्त दरवाजा उघडून खोलीत यायचं एवढाच सीन करायचा होता, मात्र दुसऱ्या दिवशी दिवसभर टॉम फक्त दरवाजा उघडून आत बाहेर करत राहिला, पण तो सीन काही ओके झाला नाही. अखेर दिवस संपला तेव्हा त्याने स्टॅनलीना न राहवून विचारलं, ‘काल आपण ५१ शॉट्स पूर्ण केले जे खूप अवघड होतं. तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाहीत. आज फक्त दरवाजा उघडून आत यायचं होतं आणि तेच जमत नाही आहे. काय अडचण काय आहे?’ यावर ते म्हणाले, ‘तुला जमत नाही आहे हीच तर अडचण आहे. काय चुकतंय हे मी सांगू शकत नाही. काय बरोबर आहे हे निश्चितपणे सांगू शकतो. तुला बरोबर जमलं की त्याचक्षणी मी ओके सांगेन. शेवटी ती माझी फ्रेम आहे’. पिकासोच्या चित्रावर जसं त्याचं हस्ताक्षर आहे आणि शतकं उलटल्यानंतरही आपण पिकासोचं चित्र म्हणून त्याचं कौतुक करतो. तसंच मलाही वाटतं. मी स्टॅनली क्युब्रिकसारखा ग्रेट दिग्दर्शक नाही, पण लोकांनी म्हटलं पाहिजे की ही निखिल अडवाणीची फ्रेम आहे, इतक्या योग्य पद्धतीने मला माझं काम करायला आवडतं, असं निखिलने स्पष्ट केलं. आपल्या या परफेक्शनच्या आग्रहापायी दहा मिनिटांत एक मोठा सेट आर्ट टीमने उभारला होता, याची आठवणही त्याने सांगितली. या मालिकेचं चित्रीकरण दिल्ली, कर्नाल, पटियाला, काही कारगिल भागांत करण्यात आलं आणि मग इथे मुंबईत कारगिलचा सेट उभारण्यात आला. या एलओसीच्या पाश्र्वभूमीवर एक हेलिकॉप्टर उतरतं आहे, असं दृश्य होतं. मात्र आजूबाजूला जो एलओसीचा सेट उभारला होता त्यामुळे हेलिकॉप्टर खाली उतरवणं शक्य नाही. तो सेट उडून जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. ‘मी टीमला तो पूर्ण सेट काढायला लावला. आमचं हेलिकॉप्टर लँड झालं. आम्हाला हवं होतं ते दृश्य मिळालं आणि मग पुन्हा तो सेट उभारायला सांगितला. ज्या टीमने दोन दिवस खपून तो सेट तयार केला होता. त्या टीमच्या शंभर माणसांनी एकत्र येऊन अवघा दहा मिनिटांत तो सेट पुन्हा उभा केला,’ असं सांगत हा प्रसंग कायम आपल्या स्मरणात राहील, असेही त्याने सांगितले.

मराठी चित्रपटासृष्टीत ‘लोकमान्य’ चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून त्याला प्रवेश करायचा होता, मात्र चित्रपटाचे दिग्दर्शन आपण करणार ही अट मान्य न झाल्याने ती गोष्ट राहून गेली. पण मराठीत जी साहित्याची ताकद आहे. विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडेंसारख्या लेखकांचे साहित्य हे आजही प्रत्येकाला थक्क करणारं आहे. ते कुठेतरी चित्रपटातून यायला हवं. चैतन्य ताम्हाणेसारखा तरुण दिग्दर्शक चित्रपट हे माध्यम काय आहे त्याची ताकद दाखवून देईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.