‘मी सध्या बॉलीवूड सिनेमे पाहाणं बंद केलंय. कारण, ते पाहताना मला सतत वाटत राहतं की, त्यातील एखादी व्यक्तीरेखा मी साकारली असती तर उत्तम झालं असतं’, असं मत अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केलं. युनीट प्रोडक्शन निर्मित ‘चरणदास चोर’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळ्यासाठी तसेच आपल्या शिष्याला शुभेच्छा देण्यासाठी नीना गुप्ता उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : त्या मुलीने काळजी घ्यायला हवी होती; बलात्काराबद्दल किरण खेर यांचे वादग्रस्त विधान

आपल्या खुमासदार शैलीत नीना गुप्ता म्हणाल्या की, मी आजवर एकही मराठी सिनेमा पाहिलेला नाही. त्यामुळे चरणदास चोर हा मी पाहिलेला पहिला सिनेमा ठरेल. हिंदीच्या तुलनेत मराठी भाषेतील साहित्य उत्तम आहे. मराठीत खूप चांगले विषय हाताळले जातात. त्यामुळे मराठी सिनेमा हा जास्त आशयघन आहे. बॉलिवूड सिनेमांमुळे मराठी चित्रपटांना खूप संघर्ष करावा लागतो. पण, मला आशा आहे की लवकरच यावर तोडगा निघेल आणि मराठी सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. मी सध्या बॉलीवूड सिनेमे पाहाणं बंद केलंय. कारण, ते पाहताना मला सतत वाटत राहतं की, त्यातील एखादी व्यक्तीरेखा मी साकारली असती तर उत्तम झालं असतं. पण, तसं घडत नाही, याचं मला दु:ख होतं. आता तर माझा शिष्य श्याम महेश्वरी मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक झालाय, तर मला मराठी भाषा शिकावी लागेल. कारण, आता मला मराठी चित्रपटात काम मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

संत कबीर आणि गीतकार मंदार चोळकर यांच्या रचनांना सोनी मिक्स वाहिनीच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या इंडीयन म्युझिक लॅबच्या रोहित मांजरेकर यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक तसेच संत कबीरांचे दोहे गाणारे, अशी भारतभरात ओळख असलेले मध्य प्रदेशातील महान गायक पद्मश्री प्रल्हाद टिप्पणिया यांनी ‘होशियार रहना के नगर में चोर आवेगा’ हे चित्रपटाच्या कथेला साजेसे असलेले गीत गायले आहे. त्याचबरोबर आतीफ अफजल, प्रीती देशमानकर, गीतसागर, गौरव बांगिया, पावनी पांडे, अली अस्लम यांनी इतर गाण्यांना स्वरसाज चढवला आहे.

वाचा : ”पद्मावती’ सिनेमात खिल्जीला चुकीच्या पद्धतीने दाखवले’

रोमान्स, ॲक्शन, भव्य सेट्स, ग्राफीक्सचा प्रभावी वापर, भलीमोठी स्टारकास्ट आणि बीग बजेट असे समीकरण असलेल्या जमान्यात उत्तम कथानक आणि परिस्थितीजन्य, तार्किक-मार्मिक विनोदी असलेला ‘चरणदास चोर’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now i stop watching bollywood movies says neena gupta