हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप व अ‍ॅक्वामॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड या दोघांमधील वादाचा फटका डिसी युनिव्हर्सला बसत आहे. डीसीचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून चर्चेत असलेला ‘अ‍ॅक्वामॅन २’ हा सुपरहिरोपट जॉनी आणि अ‍ॅम्बरमधील वादामुळे खोळंबला आहे. अ‍ॅम्बर हर्ड ‘अ‍ॅक्वामॅन’मध्ये मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. मात्र तिची या चित्रपटातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जॉनीचे चाहते करु लागले आहेत.

अवश्य वाचा – अभिनेत्रीने केला घटस्फोटित पतीवर हल्ला; क्लिप व्हायरल…

जवळपास एक लाख ५० हजारांपेक्षा अधिक लोकांनी ‘अ‍ॅक्वामॅन २’च्या निर्मात्यांना इमेल करुन तिला चित्रपटात न घेण्याची विनंती केली आहे. जर तिला चित्रपटात काम मिळाले तर ही मंडळी ‘अ‍ॅक्वामॅन’वर बहिष्कार टाकणार आहेत. जॉनी डेपच्या चाहत्यांनी दिलेल्या या धमकीमुळे तिला आता चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

अ‍ॅम्बर हर्ड ही जॉनी डेपची घटस्फोटित पत्नी आहे. तिने जॉनीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करुन घटस्फोट घेतला होता. परंतु अलिकडेच लीक झालेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे ते आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले. तिने केलेल्या या खोट्या आरोपांमुळे जॉनी डेपचे चाहते मात्र संतापले आहेत. त्यांनी ‘जस्टिस फॉर जॉनी’ अशी एक चळवळच सोशल मीडियावर सुरु केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपटाचा सहनिर्माता रॉब कोव्हन देखील या विरोधात सामिल झाला आहे. त्याने अ‍ॅक्वामॅन २ चे चित्रीकरण पूर्णपणे थांबवले आहे. परिणामी चित्रपटाला कोट्यवधींचे नुकसान होत आहे. आणि या नुकसानातून बाहेर येण्यासाठी अ‍ॅम्बर हर्डची चित्रपटातून हकालपट्टी करण्यात येणार अशी शक्यता आहे.