ओटीटी प्रेक्षकांच्या अपेक्षा अव्वाच्या सवा उंचावून ठेवलेल्या स्क्वीड गेम या कोरिअन वेबमालिकेच्या दुसऱ्या हंगामातल्या पसरट कथेनं या अपेक्षांचा फुगा फोडला होता आणि आता तिसऱ्या हंगामात तर प्रेक्षकांच्या अपेक्षांचा पार चुराडा झाला आहे. स्वार्थी, पाशवी, क्रूर जगात चांगुलपणाला फार मोठी किंमत मोजावी लागते, हे दिग्दर्शकाला पटवून द्यायचं आहे, पण जगण्यातला आशावादही सोडायचा नाही अशा पेचातलं अडकलेपण संपूर्ण तिसऱ्या सीझनभर साचून राहतं. त्यात कथेचा आत्मा हरवून केवळ संवेदनाशून्य कल्लोळ शिल्लक राहतो, तोही अधिक रक्तरंजित.

पैशांसाठी सुरू झालेला रक्तपिपासू खेळ नायक सेओंग गि हून (अभिनेता ली जंग जे) पहिल्या पर्वात जिंकतो. दुसऱ्या पर्वात तो जिंकलेला सर्व पैसा खर्चून खेळामागे दडलेल्या क्रूरकर्म्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो. अखेर पुन्हा त्याला खेळाचं आमंत्रण मिळाल्यानं तो खेळाडूंसोबत राहून त्यांना खेळापासून परावृत्त करण्याचे, खेळ खेळवणाऱ्यांविरोधात बंड करण्याचे सर्व प्रयत्न करतो. तिसऱ्या पर्वाची सुरुवातच उमेद हरवलेल्या सेओंग गि हूनच्या हताशेपासून होते.

बंड करण्यात अयशस्वी ठरलेला, त्या बंडापायी जीव गमावलेल्यांचा सल मनात बाळगलेला, हात बांधून ठेवलेला, खेळायचं की थांबायचं याची निवड करण्याची संधीही गमावलेला, नैराश्य आलेला नायक (खेळाडू क्र. ४५६) प्रेक्षकांची सीझन पाहण्याची उमेद सुरुवातीलाच घालवतो. तिसऱ्या सीझनमध्ये तीन खेळ आहेत. पहिला लपाछपीचा आहे. पण यात लपणाऱ्यांनी स्वत:चा जीव वाचवायचा आहे तर शोधणाऱ्यांनी त्यांना संपवायचे आहे. तिसरा खेळही असाच रक्तरंजित आहे. तिसरा सीझन एकुणातच पहिल्या दोन हंगामांच्या तुलनेत अधिक रक्तरंजित आहे. पहिल्या सीझनमध्ये खेळाचे सूत्रधार हरलेल्या खेळाडूंना ठार करत होते. तिसऱ्या सीझनपर्यंत हा प्रवास खेळाडूंकडूनच अन्य खेळाडू संपवण्यापर्यंत येऊन ठेपतो. ही मालिका माणसाच्या स्वभावातील सगळ्यात काळी बाजू समोर आणते, जिथे हताशेपोटी माणसं एकमेकांची फसवणूक करतात, हिंसाचार करतात. ही हिंसा इतकं टोक गाठते की आप्तस्वकीयांचा बळीही देतात. जिवंत राहण्यासाठी आणि पैशासाठी धडपडताना माणूस आपली माणुसकी हरवतो. काही खेळाडूंनी सहवेदना आणि माणुसकी दाखवली, तरी ती भावना अनेकदा इतरांच्या लोभ आणि हताशेच्या पुढे फिकी पडताना दिसते.

या नकारात्मक वातावरणात आशेचा किरण दाखवण्यासाठी दिग्दर्शक ह्यांग डोंग ह्युक यांनी रक्तपातात एक अंकुरही प्रसवला आहे. या भागावर अनेक प्रेक्षकांनी समाजमाध्यमातून टीका केली आहे. खेळाडू क्र. २२२ म्हणजे किम जून ही (अभिनेत्री जो यू री) ही गर्भवती खेळाडू बाळाला जन्म देते. जून ही चे पहिले बाळंतपण अवघ्या पाच मिनिटांत करण्याची किमया दिग्दर्शकाने साकारली आहे. शिवाय नंतर या बाळाचे खाणे-पिणे, शी-शू असले कोणतेच प्रश्न उभे राहात नाहीत. अर्थात एकूणच मालिकेतल्या ज्या अनेक अतर्क्य गोष्टी आहेत, त्या तुलनेत या नगण्य आहेत. तर हे बाळ पुढे आईची जागा खेळाडू म्हणून घेते तिथेच मालिकेचा शेवट ठरतो. पण यामुळे सेओंग गि हूनचा त्याग प्रेक्षकांना पचलेला नाही.

जगातली अनेक देशांमधील युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक असमानता, मानवाने स्वार्थापोटी केलेला पर्यावरणाचा ऱ्हास, राजकीय अस्थिरता, लोकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना या सर्व पार्श्वभूमीचे पडसाद या मालिकेवर दिसतात. म्हणून या मालिकेच्या शेवटी बाळ उरते. बाळाला चांगले जग मिळण्यासाठी गि हूनचा त्याग गरजेचा आहे, असा वास्तववादी शेवट करायचा होता, असे दिग्दर्शक ह्यांग डोंग ह्युक यांनी अलीकडेच नेटफ्लिक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. वाईटावर चांगल्याचा विजय होण्यासाठी कधी कधी बलिदान गरजेचे असते असा संदेश या मालिकेतून देण्याचा प्रयत्न आहे. पण या जगासमोर उदाहरण ठेवण्याच्या प्रयत्नात ह्युक यांनी अनेक कच्चे दुवे मालिकेत तसेच ठेवले आहेत. स्क्वीड गेमचा सूत्रधार – फ्रंट मॅन – हाँग इन हो (अभिनेता ली ब्यूंग हून) याच्यातली करुणा शेकडो बळी घेतल्यानंतर जागते, त्याला शोधायला आलेला त्याचा पोलीस भाऊ त्या बेटावर येऊन नेमका काय करतो, त्याच्या हाती काय लागते याची उत्तरं मिळत नाहीत. सीझन १ मध्ये कठोर नियमांमुळे तणाव वाढायचा, पण सीझन ३ मध्ये पटकथेनुसार खेळाचे नियम सतत बदलताना दिसले. नाही म्हणायला नो युल हे एक पात्र मात्र आपल्या उद्दिष्टावर, त्यानुसारच्या वागण्यावर अखेरपर्यंत ठाम राहिलेलं दाखवलं आहे.

थोडक्यात काय, तर भांडवलशाहीची काळी बाजू तिसऱ्या सीझनमध्येही गरिबांच्या नाकावर टिच्चून कायम राहते. श्रीमंत लोक मुखवट्याआड हताश गरिबांचा खेळ आपल्या करमणुकीसाठी पाहात राहतात. ना व्हीआयपी बदलतात, ना खेळ थांबतो, सुरू असलेल्या खेळाचा गाशा गुंडाळला जातो पण शोषणाची यंत्रणा तशीच चालू राहते, हे गाड्यांमध्ये बसून परतीच्या वाटेला लागलेल्या श्रीमंतांमुळे दिसून येते. माणुसकी जिवंत राहते पण काही थोडक्या लोकांमुळे. पण हे वास्तव समजण्यासाठी सीझन ३ चे सर्व सहा भाग सहन न होईपर्यंत पाहण्याची खरेच गरज होती का हा प्रश्न मात्र उरतो.

स्क्विड गेम ३

ओटीटी – नेटफ्लिक्स