ओटीटीवरील मारधाड, क्राइम सिनेमांच्या भाऊगर्दीत डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झालेला ‘द स्टोरीटेलर’ सिनेमा लक्ष वेधून घेत आहे. गोष्ट सांगणाऱ्याची ही गोष्ट अतिशय सुरेख गुंफण्यात आली आहे. सिनेमाची कथा एका कथाकाराभोवती – कलकत्याच्या तारिणी बंदोपाध्याय भोवती फिरते. तारिणी एकदा एका मुलाची गोष्ट सांगत असतो – या मुलाला शाळेत मार्क्स आवडतात. पण मोठेपणी आणखी एका मार्क्सबद्दल कळतं. या मार्क्सने सांगितलेलं असतं की एका लेखकाला जिवंत राहण्यासाठी पैसे कमवायचे आहेत, पैसे कमावण्यासाठी जिवंत राहायचं नाही… मार्क्सचं हे तत्त्वज्ञान तारिणी बंदोपाध्याय जगत असतो. त्याला छान गोष्टी रचता येतात, पण तारिणी कधी त्या गोष्टी प्रकाशित करत नाही. एकतर आळस आणि लोकांना त्या गोष्टी आवडतील की टीका होईल ही भीतीही असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलगा अमेरिकेत सेटल असतो. सिनेमाची सुरुवातच तारिणीच्या रिटायरमेंटच्या दिवसापासून होते. त्याने आपल्या ६२ वर्षांच्या आयुष्यात स्वच्छंदी वृत्तीमुळे ७२ नोकऱ्या केलेल्या असतात. मासे आणि दुर्गापूजा त्याचा प्राण. भांडवलशाहीचा त्याला विशेष राग. या रागातूनच अमेरिकेत मुलाकडे जाण्यास तो राजी नसतो. कोलकाताही त्याला सोडवत नाही. पण वर्तमानपत्रात एक जाहिरात येते. अहमदाबादमधील एका व्यापारी झ्र रतन गरोडियाला एक गोष्टी सांगणारा हवा असतो. कारण त्याला निद्रानाशाचा त्रास असतो.

आपल्या कथांचं उद्याोगपतीला कौतुक आहे याचा तारिणीला अभिमान वाटतो. तो गुजरातमध्ये राहायला तयार होतो. गरोडियाच्या उसनं अवसान आणून शाकाहारी ढोकळ्या, थेपल्याचं कौतुक करतो. आठवी शिकलेला गरोडिया पक्का व्यापारी वृत्तीचा असतो. पुस्तकांचं भलंमोठं कलेक्शन पण एकही पुस्तक वाचलेलं नसतं. झोपेचे प्रयोग फार यशस्वी होत नाहीत, पण कोलकात्याहून अहमदाबादपर्यंत आयत्या चालून आलेल्या ताज्या, फडफडीत अस्सल कथा तर यशस्वी होण्यास सक्षम असतात. तारिणीला त्या छापायच्या नसतात, तेव्हा गरोडियाला त्यात आपल्या व्यापारी वृत्तीमुळे लांब गेलेल्या प्रेयसीवर छाप पाडण्याची संधी दिसते. त्या कथा गरोडिया स्थानिक मासिकात ‘गोर्की’ या टोपणनावाने प्रकाशित करू लागतो… तारिणी त्यावर काय युक्ती शोधतो, हे सिनेमातच पाहायला हवे.

मध्यवर्ती भूमिका असलेला तारिणी अभिनेता परेश रावल यांनी पूर्ण ताकदीने उभा केला आहे. गरोडियाची भूमिका अभिनेता आदिल हुसैन यांनी केली आहे. तनिष्ठा चॅटर्जी आणि रेवती या अभिनेत्रींच्या भूमिका लहान आहेत, पण त्याही कसदार आहेत. कलावंतांचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. दुसरी मोठी बाजू संवादांची आहे. ह्यसरस्वतीला लक्ष्मी पसंत नाहीह्ण, ह्यइन्सोम्निया श्रीमंतांचं, पर्यायाने कॅपिटॅलिझमचं बायप्रॉडक्ट आहेह्ण, ह्यगरोडिया कापड विकतो आणि मी सूत काततोह्ण, असे अनेक खुमासदार संवाद सिनेमाचं वजन वाढवतात.

पण सिनेमाची खरी ताकद कथाच आहे. सत्यजीत राय यांच्या शताब्दीनिमित्त त्यांची ‘गोलपो बोलो तारिणी खुरो’ ही लघुकथा दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या सिनेमासाठी निवडली. महादेवन यांनी किरीट खुराणा यांच्यासह पटकथा लिहिली आहे. ही मूळ कथा १९८५ च्या आसपासची आहे. सिनेमातला काळही तेव्हाचाच. तो उत्कृष्ट छायालेखनाने चपखल उभा केला आहे. कलकत्त्यातील तांबड्या रंगाच्या इमारती, मित्रांच्या ‘तारिणी टेल्स’साठी होणाऱ्या मैफिली, ग्रामोफोनवर वाजणारी गाणी ही तिथली कलेची आसक्ती दाखवून देतात. दुसरीकडे एकेकाळी साहित्य, कला यात अग्रेसर असलेलं गुजरात राज्य, कलेच्या बाबतीत कसं उदासीन होत गेलं, यावर दिग्दर्शक भाष्य करतो. कलकत्त्यात दुर्गापूजा करून परतलेल्या तारिणीला अहमदाबादमधील त्याची मैत्री झालेली ग्रंथपाल सुझी फिबर्ट गरब्याच्या झालेल्या कर्णकर्कश व्यापारीकरणाबद्दलची खंत बोलून दाखवते. या रुपकांमधून दोन्ही राज्याच्या भिन्न संस्कृती दर्शवल्या आहेत. हा सिनेमा दोन भिन्न राजकीय तत्त्वांचा आहे. तारिणी माशांचा वासही सहन न होणाऱ्या गरोडियाच्या स्वयंपाकघरात मासे शिजवून खातो, पण आपल्या आवडीला मुरड घालत नाही. भांडवलशाही वृत्तीचा गरोडिया मात्र स्वार्थापुढे सर्व तत्त्वांना मुरड घालतो. आधी तारिणीच्या गुपचूप सुरू असलेल्या मांसाहाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो आणि शेवटी तर बुद्धी तल्लख होते या समजाखाली मासेही खाऊ लागतो.

हा सिनेमा आत्मशोधाचा आहे. आपल्या कथांवर विश्वास ठेवून तारिणी आणि आपल्यातल्या कथाकाराला शोधत गरोडिया अखेर एका समेवर येतात. हा सिनेमा प्रभावी होण्याचं कारण म्हणजे त्याचा ठहराव. हे थांबणं, हळूहळू रिचत जाणं हीच तर गोष्टीची खासियत असते. आजीची गोष्ट ऐकता ऐकता झोप हळुवार डोळ्यांत उतरते कारण गोष्ट ऐकता ऐकता आपण हलकेच त्या गोष्टीच्या प्रदेशात शिरलेले असतो. या सिनेमातल्या गोष्टीतही आपण असेच प्रवेशतो. सिनेमातला ‘हुक पॉइंट’ही आपल्यासमोर सावकाश येतो.

दिग्दर्शक : अनंत महादेवन

कलावंत : परेश रावल, आदिल हुसैन, तनिष्ठा चॅटर्जी, रेवती व अन्य

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie the storyteller released on disney hotstar attracting attention of audience zws