मराठी माणूस हा नाटकवेडा. मग तो भारतात राहत असो किंवा परदेशात, त्यांना नाटक पाहण्याची नेहमीच उत्सुकता असते. परदेशातील चाहत्यांमुळेच मराठी नाटकं साता समुद्रापार गेली. पण आतापर्यंत मराठी नाटकासाठी नायक-नायिका जेवढय़ा वेळा परदेशात गेल्या नसतील तेवढे दौरे केले आहेत ते दोन पडद्यामागच्या कलाकारांनी. प्रकाश खोत आणि किशोर इंगळे, या त्या दोन व्यक्ती. खोत पाश्र्वसंगीत सांभाळतात, तर इंगळे प्रकाश योजनेचे काम करतात. या दोघांनी एकत्रितपणे जवळपास ३० परदेश दौरे केले आहेत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्विर्त्झलंड, यांसारख्या बऱ्याच देशांमध्ये या दोघांनी नाटकाच्या प्रयोगात मोलाचा वाटा उचलला आहे.

खोत यांचे दोन मोठे बंधू या क्षेत्रात होते. साल १९८९. मच्छिंद्र कांबळी यांचे ‘राम तुझी सीता माऊली’ हे नाटक पाहायला ते गेले. २०-२५ प्रयोग बसून त्यांनी पाश्र्वसंगीत कसं करतात, हे आवडीपोटी शिकून घेतले. जो मुलगा हे पाश्र्वसंगीत करत होता त्याला चांगली नोकरी मिळाली. त्यामुळे खोत यांना पाश्र्वसंगीतासाठी बोलावले गेले. गडकरी रंगातयनमध्ये त्यांनी पहिला प्रयोग केला आणि आतापर्यंत त्यांची ही रंगभूमीची सेवा अविरत सुरू आहे. तंत्रज्ञानाचे बदल आत्मसात करत आता ते थेट लॅपटॉवरूनही काम करतात. ‘सुयोग’ संस्थेच्या बऱ्याच नाटकांमध्ये त्यांनी हातभार लावला आहे. काही वेळा पाश्र्वसंगीताबरोबर नाटकातील लहान भूमिकाही केल्या. पाश्र्वसंगीताची जबाबदारी सांभाळून ‘वस्त्रहरण’, डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर ‘मित्र’ या नाटकातही त्यांनी काम केलं आहे.

परदेशात जाताना फार कमी संच नेला जातो. महाराष्ट्रात नाटक करताना जवळपास २५ माणसांचा संच पडद्यामागे असतो. पण परदेशात मात्र ४-६ जणांवरच ही जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे या दौऱ्यांमध्ये नेपथ्य आणण्यापासून ते लावण्यापर्यंत, कपडेपट, पाश्र्वसंगीत, प्रकाशयोजना या साऱ्या गोष्टी खोत आणि इंगळे या दोघांनी केलेल्या आहेत. या दोघांनी १९९७ साली ‘सुयोग’चे ‘चार दिवस प्रेमाचे’ हे पहिले नाटक इस्त्राईलला केले. हा त्यांचा पहिला परदेश दौरा. त्यावेळी या दोघांचा विमानात बसण्याचा प्रवास सुरू झाला तो आजतागायत. परदेशात आतापर्यंत या दोघांनी जवळपास २५० प्रयोग केले आहेत आणि या वर्षांतही बऱ्याच परदेशवाऱ्या त्यांच्या घडणार आहेत.

‘निर्मात्यांच्या विश्वासाशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यांनी आमच्या दोघांवर विश्वास ठेवला आणि आम्ही त्यांना कधीही कसलीही कमतरता भासू दिली नाही. आम्ही कधीही मानधन किती देणार, असे प्रश्न विचारले देखील नाहीत. पण या निर्मात्यांनी कधीही आमच्याबरोबर दुजाभाव केला नाही. परदेशात राहण्यासाठी, जेवणासाठी आम्हाला नटांबरोबर घेऊन जायचे. त्याचबरोबर परदेशातील प्रेक्षणीय स्थळं, नाटकं आणि खासकरून ऑपेरा, हे त्यांनी आम्हाला दाखवले. दुसरी गोष्ट म्हणजे प्रशांत दामले यांच्याबरोबर गाणी असलेली बरीच नाटकं मी केली. त्यांच्या गाण्याला मी पाश्र्वसंगीत देतो, ही भावना सुखावणारी आहे,’ असं खोत सांगत होते.

अशोक हांडे यांच्या ‘मंगलगाणी दंगलगाणी’पासून इंगळे यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीला ते नेपथ्याचे काम करायचे. कपडेपट सांभाळायचे. त्यानंतर त्यांच्याकडे प्रकाशयोजनेची जबाबदारी आली. त्यानंतर ‘सुयोग’ संस्थेबरोबर जवळपास बरीच नाटकं केली. मराठीबरोबर इंग्रजी, हिंदी, तामिळ नाटकांसाठीही त्यांनी काम केले आहे आणि यासाठीच त्यांचा बऱ्याचदा सत्कारही झाला आहे.

बरेच परदेश दौरे झाले आणि गमतीदार गोष्ट घडणार नाही असं कसं होईल. इंगळे यांच्याबाबतीत एक असा किस्सा घडला आणि आपली चूक असतानाही त्यांनी तो स्पष्टपणे सांगितला.

‘एका दौऱ्यात ३-४ नाटकं घेऊन निर्माते गेले होते. प्रत्येक दिवसाला २-३ प्रयोग व्हायचे. त्यामुळे एका तासात नेपथ्य काढून पुन्हा लावावे लागायचे. त्याचबरोबर कपडेपट, प्रकाशयोजना या जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागायच्या. आणि हे प्रयोग सलग काही दिवस चालायचे. त्यामुळे थकायलाही व्हायचं. त्यावेळी ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग होता. नाटय़गृहात फक्त ‘टय़ुब लाइट्स’ होत्या आणि त्याच्यावर काम करायचे होते. हे फारसे सोपे नव्हते. त्यामुळे आम्ही काही क्लृप्त्या शोधल्या. दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले शिटी वाजली की सर्व ‘लाइट्स’ बंद करायच्या आणि पुन्हा शिटी वाजली की सुरू करायच्या. पण सततच्या प्रयोगामुळे फार थकलो होतो. त्यामुळे प्रयोग सुरू होण्यापूर्वी सोफ्यावर बसलो आणि माझा डोळा लागला. मला झोप कधी लागली ते कळलेच नाही. मध्यंतरा वेळी केंकरे साहेब आणि राजन भिसे भेटायला आले. प्रकाशयोजना चांगली झाली, असे सांगत त्यांनी कौतुक केले. मला काहीच कळत नव्हतं. मध्यांतर झालं हेदेखील मला माहिती नव्हतं. मी त्यांना घडलेली हकिकत सांगितली आणि सपशेल माफी मागितली. पण प्रकाशयोजना कुणी केली हे कळेना. माझ्या जागेवर तिथला स्थानिक माणूस बसला होता. त्याच्याशी केंकरे साहेबांनी संवाद साधला. तेव्हा आम्हाला समजले की केंकरे साहेब मला सर्व गोष्ट समजावताना त्याने ती ऐकली होती आणि मी झोपलेला पाहून त्याने प्रकाशयोजनेचे काम चोख बजावले होते. तिथे जाऊन मी त्याचे पाय धरले. कारण त्यानेच मला वाचवले होते. पण त्यानंतर मात्र कधीच अशी चूक माझ्याकडून घडली नाही, असं इंगळे सांगत होते.

कुठल्याही नाटकाचा परदेश दौरा असला तर निर्मात्यांच्या डोळ्यांपुढे पहिल्यांदा खोत आणि इंगळे, यांचीच नावं येतात. प्रसिद्धी, ग्लॅमरपासून ते नेहमीच लांब राहिले. प्रेक्षकांसमोर त्यांचे चेहरे येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे परदेश दौऱ्यातील पडद्यामागच्या या किमयागार जोडीची ‘विंग बिंग’च्या माध्यमातून पहिल्यांदाच वाचकांना ओळख करून दिली आहे.