अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून भारताबाहेर असली तरीही सध्या मात्र ती भारतात परतली आहे. प्रसारमामध्यमं आणि चाहत्यांच्या गराड्यात असणाऱ्या या ‘देसी गर्ल’ने तिच्या व्यग्र कामातून वेळ काढत मुंबईत पार पडलेल्या ‘स्टारडस्ट पुरस्कार २०१६’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकावर अनेकांच्याच नजरा खिळल्या होत्या. बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर सध्या प्रियांकाने तिचा मोर्चा हॉलिवूडकडे वळवला आहे. पण, असे असले तरीही प्रियांकाच्या वाट्याला आलेली ही लोकप्रियता आणि यश इतक्या सहजा सहजी आलेले नाही हेच खरे.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्राने विविध विषयांवर तिच्या प्रतिक्रिया दिल्या. ‘मुंबईत माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पण, हे सर्व काही इतके सोपे नव्हते. चित्रपटसृष्टीतही सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला बऱ्याच अडचणी आल्या होत्या’, असे प्रियांका म्हणाली. ‘इतरांकडून आदर मिळवण्याच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागते. त्यामुळे ‘हा हा अभी देखा’ असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही. माझ्या वाट्याला आलेल्या यशाचा मला अभिमान आहे. मी त्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. मी आजवर कोणत्याही गोष्टीसाठी तडजोड केली नाहीये’, असेही प्रियांका म्हणाली.
‘मला याबद्दल फारच गर्व वाटत आहे. मी त्या सर्वांची आभारी आहे ज्यांनी आजवर सोशल मीडियावर मला पाठिंबा दिला आहे. माझ्या मते भारतातील काही व्यक्तिंचा या यादीतील पहिल्या दहा नावांमध्ये समावेश असावा. या यादीमध्ये माझे नाव असल्याचा मला फारच आनंद आहे’, असे म्हणत प्रियांकाने तिचा आनंद व्यक्त केला. दरम्यान, काही दिवसांसाठी भारतात परतलेल्या प्रियांकाने नुकतेच ‘कॉफी विथ करण’ या चॅट च्या एका भागाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. यावेळी प्रियांकाने बोलण्याच्या ओघात ती भारतात आगामी दोन चित्रपटांच्या बोलणीसाठी आली असल्याचेही स्पष्ट केले.