रकूल प्रित सिंह ही बॉलिवूडमधील फिट अँड फाईन अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी ती दररोज व्यायाम करते. शिवाय ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना देखील व्यायामाचं महत्व समजवून सांगण्याचा कायम प्रयत्न करते. यावेळी देखील तिने असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क कारसोबत शर्यत करताना दिसत आहे.

रकूल या व्हिडीओमध्ये सायकल चालवताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे सायकलवरुन ती कारसोबत शर्यत करत आहे. तिने तब्बल १२ किलोमिटर सायकल चालवली आहे. “आज मी स्वत:च्या क्षमतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतेय. पाहा मी १२ किलोमीटर सायकल चालवली.” अशा आशयाची कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत रकूलची स्तुती केली आहे.