हॉलिवूडचा गाजलेला अॅक्शनपट ‘रॅम्बो’चा हिंदी रिमेक होणार असल्याची बरीच चर्चा होती. ‘रॅम्बो’ची भूमिका साकारण्यासाठी ह्रतिक रोशन आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांच्या नावाचा विचार सुरू होता. अखेर ही भूमिका करण्याची संधी टायगर श्रॉफला मिळाल्याचे काल ‘कान’ चित्रपट महोत्सवात स्पष्ट झाले. ‘रॅम्बो’ची मूळ भूमिका साकारणारा अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोननेही या बॉलिवूड चित्रपटाला त्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता ‘रॅम्बो’चा रिमेक करण्यासाठी निर्माता आणि दिग्दर्शकाला आणखीनच हुरुप आला आहे.

सिल्वेस्टरने त्याच्या हटके शैलीत हिंदी रिमेकला पाठिंबा दिला. त्याने अगदी छोटासा संदेश देत चित्रपट करताना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्याने स्वतःच्या चित्रपटाचा पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलंय की, भारतात ‘रॅम्बो’चा रिमेक होत असल्याचे मी नुकतेच वाचले. ती एक उत्कृष्ट व्यक्तिरेखा आहे. ती तशीच पडद्यावर पुन्हा उतरवली जाईल अशी अपेक्षा करतो.

आपल्या अॅक्शन सीन्स आणि मार्शल आर्टसाठी बॉलिवूडमध्ये नावाजल्या जाणाऱ्या टायगरने, ‘मी सिल्वेस्टर स्टॅलोनची जागा घेऊ शकत नाही. पण, त्याचसोबत त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही याची मी काळजी घेईन,’ असे म्हटलेय. त्याने त्याच्या ‘रॅम्बो’ चित्रपटाचा पोस्टर ट्विट केला आहे. हा पोस्टर पाहता सिल्वेस्टर आणि टायगरमध्ये अजिबात फरक जाणून येत नाही. जणू आपण सिल्वेस्टरलाच पाहत आहोत असेच आपल्या वाटते. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

‘रॅम्बो’च्या रिमेकचे दिग्दर्शन ‘बँग बँग’ फेम सिद्धार्थ आनंदने केलेय. या चित्रपटाव्यतिरिक्त टायगर ‘मुन्ना मायकल’मध्येही झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करताना दिसेल.