रवींद्र पाथरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष पवार यांचं ‘यदा कदाचित’ हे नाटक इतिहास घडवणारं ठरलं त्याला आता बराच काळ लोटलाय. त्याचे सुमारे पाच हजारावर प्रयोग झाले. आतापर्यंत त्यांची साठ-सत्तर नाटकं तरी लिहून, दिग्दर्शित करून झाली असतील, इतका त्यांचा वेग प्रचंड आहे. अनेक बिनचेहऱ्याच्या, हिरोचं रंग-रूप नसलेल्या नट-नटय़ांना आपल्या नाटकांत घेऊन संतोष पवार यांनी त्यांना स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख मिळवून दिली. त्यातून त्यांचं प्रत्येकाचं करिअर मार्गी लागलं. पण यांपैकी कुणालाही त्याबद्दल संतोष पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटत नाही. नव्वदच्या दशकातले बडे रंगकर्मी इतर माध्यमांत गेल्याने मधल्या काळात रंगभूमीला तारणहारच उरला नव्हता. अशा काळात ज्यांनी संतोष पवार यांना आधी भरपूर नावं ठेवली होती, त्यांनीच त्यांचा आधार घेऊन अनेक नाटकं केली आणि आपल्या नाटय़संस्था तगवल्या, तारल्या. पण त्यांनीही कधी त्याबद्दल कृतज्ञतेचा शब्द काढलेला नाही. संतोष पवार यांनीही कधी कुणाकडून तशी अपेक्षा केली नाही. हा काळ संतोष पवार यांनी गाजवला. त्यांच्या नाटकातला आशय काय, विषय काय, याला फारसं महत्त्व नव्हतंच कधी. ते जे काही करतील त्याला त्यांचा प्रेक्षक दाद देत होता.. गर्दी करीत होता. ‘आपला खास प्रेक्षक’ त्यांनी घडवला होता. त्यामुळे संतोष पवारही इतर माध्यमांकडे कधी वळले नाहीत फारसे. शाहीर साबळे यांच्या लोककलांचा खरा वारसा कुणी पुढे चालवला असेल, तर तो संतोष पवार यांनीच. प्रचलित लोकप्रिय नाचगाणी आणि लोककलांच्या माध्यमातून वर्तमानातील घटना-प्रसंगांवर जाता जाता मल्लिनाथी हे त्यांच्या नाटकांचं वैशिष्टय़. त्या विषयाच्या खोलात मात्र ते कधीही उतरले नाहीत. त्या प्रश्नांकडे फक्त निर्देश करून ते थांबले.. थांबतात. तेही मनोरंजनाच्या धमाल अवगुंठनातून फुरसद मिळाली की! त्या प्रश्नांबद्दलची त्यांची कळकळ, असोशी कितीही खरी असूनदेखील त्यांच्या तळात ते उतरत नसल्याने प्रेक्षकही ते तिथंच सोडून देतात. त्यांची नाटकं इम्प्रोव्हाइझ तंत्रानं ते बसवत असल्याने त्यांची कुणी ‘कॉपी’ करू शकत नाहीत आणि त्याचमुळे त्यांची संहिताही कधी प्रसिद्ध होऊ शकत नाही.

हेही वाचा >>> पहिल्यांदा बालकलाकार अर्जुनच्या कॅन्सरग्रस्त आजीला दाखवला होता ‘एकदा काय झालं’ चित्रपट , ‘तो’ प्रसंग सांगत सलील कुलकर्णी म्हणाले…

असे संतोष पवार आता ‘यदा कदाचित रिटर्न्‍स’ हे नवं नाटक घेऊन आले आहेत. ‘यदा कदाचित’मधील विडंबन, उपरोध, उपहास, विसंगती, अतिशयोक्ती यांचं कॉकटेल यातही त्यांनी छान जमवलं आहे. सगळ्या ‘काळां’तील माणसांचं संमेलन हीही त्यांची एक विशेषत:! कलाकारांची अफाट एनर्जी आणि त्याचा कडक आविष्कार हे त्यांच्या नाटकांतील प्रमुख अस्त्र. हे सगळं या नाटकातही त्यांनी पुरेपूर ओतलं आहे.

भल्लाळदेव आणि बाहुबली या दोन भावांत राज्यावरून आणि देवसेनेबरोबरील विवाहाच्या पणावरून संघर्ष उभा ठाकतो. भल्लाळदेव सत्याच्या मार्गानं जाणारा. तर बाहुबली अप्पलपोटा, स्वार्थी. काहीही व कसंही करून यश मिळवू पाहणारा. साहजिकच मूल्यांचा संघर्ष त्यांच्यात होतो. त्यात कोण जिंकतं हे नाटकात पाहणंच उचित ठरावं. त्यांच्या या संघर्षांत निरनिराळ्या काळांतील व युगांतील कटप्पा, शाहिस्तेखान, विक्रम, वेताळ, बाबाश्री, क्रिकेटपटू नवज्योतसिंग, अमिताभ, रामशास्त्री प्रभुणे, विद्यमान न्यायदेवता, बिरबल, शेतकरी, तुतारीवाला, शिवगामिनी, चंद्रमुखी, देवसेना अशी पात्रांची भलीमोठी फलटणच उतरते. त्यांच्यात झडणारा संघर्ष कुठून कुठे, कसा जाईल, जातो याचा पत्ता प्रत्यक्ष हे नाटक बघणाऱ्या प्रेक्षकालाही लागत नाही, तिथं इतरांची काय कथा! नाटकाचा शेवट मात्र आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर होतो. त्यांच्या व्यथा, कथा त्यातून पुढे येतात. क्षणभर त्या पाहणाऱ्यांच्या काळजालाही भिडतात. पण ते तितकंच.

लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी असंख्य रंगीबिरंगी पात्रांच्या योजनेतून ‘यदा कदाचित रिटर्न्‍स’ हे एक धमाल विनोदी, इरसाल नाटक आकारास आणलं आहे. त्यात भरपूर लोकप्रिय नाचगाणी योजली आहेत. विनोदाच्या सगळ्या तऱ्हांचा वापर त्यांनी यात केला आहे. स्लॅपस्टिक कॉमेडीपासून पीजे, उपरोधिक, उपहासात्मक विनोद, अतिशयोक्ती.. कशाकशाचा म्हणून त्यांनी वापर केलेला नाही हे तपासूनच पाहावं लागेल. लोककलांचा वापर हा तर त्यांचा हुकमी एक्का. तो त्यांनी यात सढळ हस्ते वापरलाय. सद्य: राजकीय-सामाजिक परिस्थितीवरचे पंचेसही त्यांनी खुबीने पेरलेत आणि त्यांची रोकडी प्रचीती घेणारे प्रेक्षकही त्याला हसून-खिदळून, टाळ्या वाजवून दादही देतात. संतोष पवार यांनी यात वगनाटय़ाचा फॉर्म वापरला असला तरी ते पुढे त्यातून स्वत:ची सुटका करून घेतात आणि एक वेगळंच नाटक आकाराला येतं.. जे त्यांचं ‘स्वत:चं’ असतं. इम्प्रोव्हायझेशन तंत्रावरची आपली प्रचंड हुकुमत पणाला लावून ते रसिकांना खिळवून ठेवतात. प्रेक्षकांचं चार घटका मनोरंजन करणं हे आपलं परमकर्तव्य आहे असं ते समजतात आणि त्याला ते शंभर टक्के जागतातही.

संदेश बेंद्रे यांनी महालाचं नेपथ्य छान उभारलंय. बाकी इतर नाटय़स्थळं तमाशासारखीच प्रेक्षकांच्या मनोभूमीवर साकारतात. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना नाटकाचा वेग आणि गती कायम राखते. प्रणय दरेकर यांचं संगीत आणि अनिकेत जाधव यांची नृत्यं नाटकाची तहान भागवतात. किशोर पिंगळे यांची रंगभूषा नाटकातील पात्रांना ‘चेहरा’ प्रदान करते. संतोष पवार यांची गाणी आणि वेशभूषा नाटकाची मागणी पुरवणारी.

संतोष पवार यांनी नाटकात हरहुन्नरी सोंगाडय़ाच्या रूपात मावशी, अमिताभ, नवज्योतसिंग सिद्धू, रामशास्त्री अशा विविध भूमिकांत नेहमीसारखीच तुफान बॅटिंग केली आहे. विशेषत: नवज्योतसिंग सिद्धू, अमिताभच्या भूमिकांत त्यांनी प्रचंड धमाल केली आहे. त्यांचा रामशास्त्रीही भूमिकेचा आब राखणारा आहे. तेजस घाडीगावकर यांनी भल्लाळदेव या भूमिकेचे कंगोरे ओळखून तो साकारला आहे. रोहन कदम यांचा बाहुबली त्याची धरसोड वृत्ती अधोरेखित करतो. अनिकेत कोथरूडकर यांचा बाबाश्री लकबी आणि पंचेस, हालचाली व हावभाव नेमकेपणानं पकडतो. गौरी देशपांडे यांची चंद्रमुखी या पात्राला साजेशी. ओशीन साबळे यांनी देवसेनेचा तोरा मस्त पकडलाय. हर्षदा कर्वे यांची शिवगामिनी यथातथ्य. उमेश कांबळे यांचा बिरबल त्याची संभ्रमावस्था छानपैकी वठवतो. प्रतीक साठे यांचा शाहिस्तेखानही आपल्या वाटय़ाचे हशे वसूल करतो. निकिता सावंत (न्यायदेवता), अभिषेक औटी (शेतकरी), दर्शन बोटेकर (कटप्पा), प्रसाद रावराणे (तुतारीवाला) यांनीही आपापली कामं चोख केली आहेत.

चार घटका निव्वळ निखळ करमणूक आणि जमलंच तर शेतकरी आत्महत्येसंदर्भातील वास्तव जाणवून देणारं हे नाटक धम्माल धूडगूस घालणारं आहे, हे नक्की.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra pathare review yada kadachit returns comedy marathi natak by santosh pawar zws