स्पष्टवक्तेपणा आणि आपलं मत, विचार परखडपणे मांडणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा आज वाढदिवस. हम आप के हैं कौन या चित्रपटाच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळालेल्या रेणुका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असतात. त्यामुळे त्या कायमच चाहत्यांच्या संपर्कात असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या पोस्टवरुन किंवा त्यांनी शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओ यावरुन एकंदरीतच त्यांच्या स्वभाव गुणांचा अंदाज येतो. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच आज त्यांची आणि पती आशुतोष राणा यांची लव्हस्टोरी जाणून घेऊयात.

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची लव्हस्टोरी कोणत्याही परिकथेपेक्षा किंवा चित्रपटातील एका कथेपेक्षा वेगळी नाही. रेणुका आणि आशुतोष यांची पहिली भेट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाली होती असं म्हटलं जातं. गायिका राजेश्वरी सचदेव यांनी या दोघांची ओळख करुन दिली. त्यावेळी आशुतोष यांच्याबद्दल रेणुका यांना अजिबात माहिती नव्हती. उलटपक्षी आशुतोष यांना रेणुकाविषयी बऱ्याच गोष्टी माहित होत्या. त्यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी मी तुझा मोठा चाहता आहे असं आशुतोष यांनी रेणुका यांना सांगितलं होतं. या पहिल्या भेटीनंतर जवळपास ३ महिने ते एकमेकांना भेटले नाही. मात्र, त्यानंतर त्यांची पुन्हा भेट झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडू लागले.

एकीकडे रेणुका आणि आशुतोष यांची लव्हस्टोरी सुरु होती. ते एकमेकांशी लग्न करण्याच्या विचारात होते. तर दुसरीकडे रेणुका यांच्या आई संभ्रमात होत्या. कारण, आशुतोष हे मध्य प्रदेशमधील एका लहानशा गावातून आले होते. त्यातच त्याचं कुटुंब प्रचंड मोठं होतं. त्यामुळे रेणुका हे सगळं कसं मॅनेज करतील हा प्रश्न त्यांच्या आईला होता. परंतु, त्यानंतर रेणुका-आशुतोष यांनी आईची समजूत काढली आणि अडूच वर्षांनी त्यांनी लग्नगाठ बांधली.

दरम्यान, रेणुका शहाणे यांच्या लग्नाला आता जवळपास १९-२० वर्ष झाली आहेत. त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलंदेखील आहेत. आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे हे दोघंही कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार असून आजवर त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.