नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून अभिनयच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत रिंकूला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. या पहिल्यावहिल्याच चित्रपटातून रिंकूने अनेकांच्या मनात घर केले. आता रिंकूचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकूच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मेकअप’ असे आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर देखील दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. रिंकूचा हा बिनधास्त अंदाज तसेच तिचा हा ‘मेकअप’ कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि चिन्मय ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘मेकअप’ चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले असून वेगवगेळे विषय हाताळण्यात, काहीतरी नाविन्यपूर्ण देण्यात गणेश पंडित यांचा हातखंडा आहे. त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याव्यतिरिक्त रिंकू अभिनेता ताहिर शब्बीरसोबत ‘100’ या वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ताहिरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर रिंकूचा फोटो पोस्ट केला होता. त्याने पोस्ट केलेल्या फोटोंवरुन रिंकू वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रिंकूच्या आगामी वेब सीरिजचे चित्रीकरण माटुंगा येथे सुरु असून या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील दिसणार आहे. लारा दत्ता आणि रिंकू राजगुरु या वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. ही वेब सीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rinku rajguru make up movie avb