एमटीव्ही वाहिनीवरील रोडिज या रिअॅलिटि शोच्या ८ व्या पर्वाची विजेती आंचल खुराना हिने एका हॉटेलच्या मालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिला आणि तिच्या कुटुंबियांना मारपीट केल्याबद्दल आंचलने ही तक्रार दाखल केली आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना आंचल म्हणाली की, मला खूप आश्चर्य वाटले जेव्हा त्या हॉटेलमधले कर्मचारी मला म्हणाले की त्यांनी माझे कार्ड हरवले. मी त्या हॉटेलच्या मालकांना जास्त दक्ष राहण्याचा सल्ला दिला, जो कदाचित त्यांना आवडला नाही. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असावा. त्यांनी आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आमचा पाठलाग केला आणि आमच्याशी उद्धटपणे वागू लागले.
त्यांच्यातल्या एकाने मला शिवीगाळ करायला सुरुवात तर माझा भाऊमध्ये पडला. तु एका मुलीला शिवी कशी देऊ शकतो यासाठी माझ्या भावाने समोरच्याचे कॉलर पकडले. पण त्यानंतर त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली. माझा भाऊ जमिनीवर पडला आणि त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. यानंतर मी पोलिसांना फोन लावला आणि सगळे प्रकरण सांगितले.
तर दुसरीकडे हॉटेलच्या मालकाने दुसरीच गोष्ट सांगितली. त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, आंचल माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आम्ही अनेकदा एकत्र पार्टीही करतो. मला कळत नाही की ती या प्रकरणाला वेगळे वळण का देत आहे. उलट ती आणि तिचा भाऊ सोफ्यावर चढून नाचत होते तेव्हा माझ्या सुरक्षा रक्षकांनी नम्रतेने त्यांना सोफ्यावरुन खाली उतरायला सांगितले होते.
हॉटेलच्या मालकाने सांगितले की त्यांच्याकडून आंचलचे कार्ड हरवले गेले आहे जी खरोखरीच एक चूक होती. तिने मला बाहेर बोलावले आणि मीही तिला हे प्रकरण इथेच थांबवायला सांगितले. मी या व्यवसायात जवळपास १० वर्षांपासून आहे आणि कोणत्याही महिलेवर हात उचलण्याचा मी विचारही करु शकत नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की आम्ही कोणालाही मारले नाही. आता या प्रकरणावर न्यायालयच काय तो योग्य निर्णय देईल.