झिंगाट गाणं लागलं की आजही अनेकांचे पाय आपसूकच थिरकतात. त्यातही ती झिंगाटची ‘सिग्नेचर स्टेप’ प्रत्येकजण आपापल्या परीने करण्याचा प्रयत्न करतो. ती स्टेप केली नाही, तर त्या गाण्यावर तुम्ही नाचलाच नाही, असा काहीसा अलिखित नियमच झाला आहे. पण ती ‘सिग्नेचर स्टेप’ करणारा तो मुलगा आठवतोय का? अहो असं काय करता.. तोच तो आर्ची-परश्याच्या प्रेमाला शेवटपर्यंत साथ देणारा आयडियल मित्र ‘लंगड्या’ म्हणजेच तुमचा-आमचा लाडका तानाजी गलगुंडे. एक सिनेमा एखाद्याचं आयुष्य किती बदलवू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण द्यायचं झालं तर ‘सैराट’च्या टीमचं देता येईल. कोणीही अपेक्षा केली नव्हती, एवढं यश या सिनेमाला आणि पर्यायाने कलाकारांना मिळालं. यात खरा भाव खाऊन गेला तो तानाजी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सैराट’ हा सिनेमा आता कन्नडमध्येही आला. मुळ ‘सैराट’मधल्या कलाकारांपैकी फक्त रिंकू आणि तानाजी या दोनच पात्रांनी कन्नडमध्ये काम केले. यावरुनच या दोन पात्रांची लोकप्रियता कळते. मूळ ‘सैराट’मध्ये पहिल्यांदा काम करताना त्याला अक्षरशः घाम फुटला होता. पण त्यातही आपली भाषा असल्यामुळे त्यानं यात नैसर्गिक अभिनय केला, तो प्रेक्षकांना आवडलाही. पण, यावेळी सिनेमा जरी तोच असला तरी भाषा पूर्णपणे वेगळी होती. पण त्यानं हे शिवधनुष्य पेललं आणि कन्नड सिनेमातही मी काम करेन हा अण्णांना (नागराज मंजुळे) दिलेला शब्द खरा करुन दाखवला.

पाहाः ‘सैराट’ची ती दृश्य डोळ्यांसमोरुन जाता जाईना…

नशीब पालटलं की सगळं कसं बदलतं याचा प्रत्यय तानाजीला सैराटच्या प्रदर्शनानंतर आला. गावात एक तानाजी गलगुंडे नावाचा मुलगा राहतो, हेही फारसं कोणाला माहिती नसलेला, एका रात्रीत फक्त त्या गावचा नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा स्टार झाला होता. हातातला फोन आठ दिवसांतून एकदाही वाजायचा नाही, तोच फोन आता आठ मिनिटंही वाजल्याशिवाय राहत नव्हता. यश म्हणतात ते हेच, याची अनुभूतीच त्याला या दिवसांत येत होती.

वाचाः जुळून येती ‘सैराट कयामती’…

कन्नडमध्ये काम करण्याचा अनुभव त्यानं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी शेअर केला. मला ते काय बोलतायेत, ते कळत नव्हतं आणि मी काय बोलतोय, हे त्यांनाही कळत नव्हतं. संवाद साधायचा तरी कसा, हा आमच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता. तिथे हिंदी बोलणारंही फार कोणी नाही. आमच्यासाठी खास वर्कशॉपही ठेवण्यात आले होते, असे त्याने सांगितले. पाठ करायला दिलेली वाक्यंही नीट पाठ होत नव्हती. संपूर्ण सिनेमा करणं तर फार दूरची गोष्ट. पण नेहमीप्रमाणे त्याचा अण्णा त्याच्यासाठी धावून आला होता. अनेक गोष्टी समजून सांगितल्या. आधी तुला अभिनयही येत नव्हता. मराठीतच कसं काम करायचा हा प्रश्न तुझ्यासमोर होता. पण तेही तू केलंस ना? मग आता कन्नडपण जमेल. नागराजच्या या शब्दांनीच कन्नड सिनेमाच्या ट्रॅकवर तानाजीची गाडी पुन्हा एकदा सैराट सुटली.

सध्या तानाजी महाविद्यालयीन शिक्षण घेतोय. दोन सिनेमांमध्ये काम केलं असलं, तरी या क्षेत्रावर अवलंबून राहायचं नाही असंच काहीसं त्यानं ठरवलंय. सिनेमे मिळत गेले तर त्यात काम करायचं. पण, फक्त सिनेमा एके सिनेमा करायचं नाही, असं तो म्हणतोय. ‘सैराट’मधील हा लंगड्या भविष्यात करणार तरी काय, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्यानं दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. त्याला भविष्यात शेती करायची आहे. पण त्याला ही शेती सवडीनं करायची नाही तर आवडीनं करायची आहे, असं हा पठ्ठ्या आत्मविश्वासानं सांगतो. ‘सैराट’मधून लोकांच्या मनात घर केलेल्या या तानाजीने त्याच्या भविष्याचा निर्णय सांगून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करणार हे नक्की!

#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com  या ईमेल आयडीवर…

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat mania nagraj manjules sairat fame tanaji galgunde current profile marathi movie one year of sairat