बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अद्याप अविवाहीत आहे. आजवर संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, लुलिया वंतुर यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचे नाव जोडले गेले आहे. परंतु ५५ वर्षांचा भाईजान आजही मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून मिरवतो. सलमान खान लग्न कधी करणार? हा जणू राष्ट्रीय प्रश्नच झाला आहे. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारले जाते. दरम्यान, एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानचे वडील सलीम खान हे सलमानच्या लग्नाविषयी बोलताना दिसत आहेत.

झूम टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलीम खान यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलीम खान यांना एका पत्रकार परिषधेत सलमानच्या लग्नाविषयी विचारण्यात आले आहे. तेव्हा सलीम खान यांनी मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. ‘या प्रश्नाचे उत्तर अल्लाह देखील देऊ शकत नाही’ असे सलीम खान म्हणाले.

आणखी वाचा : सोशल मीडियावर एका गाण्यामुळे व्हायरल झालेलं हे कपल आहे तरी कोण?; जाणून घ्या त्यांच्या विषयी

इतकच नव्हे तर एकदा सलीम खान यांनी मीडियाला सलमानच्या लग्नाविषयी काही प्रश्न विचारु नका असे थेट सांगितले होते. ‘कोणतेही प्रश्न विचारा पण एक प्रश्न विचारु नका. विनंती करतो की सलमान लग्न कधी करणार हे विचारु नका’ असे सलीम म्हणाले होते.

आजवर सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण सलमान कधीही त्याच्या नात्यावर उघडपणे बोलला नाही. सध्या सलमान लुलिया वंतुरला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने अद्याप यावर वक्तव्य केले नाही. लुलिया सलमानच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.