गेल्या काही वर्षांमध्ये रिमिक्स गाण्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. ७०-८०च्या दशकात सुपरहिट ठरलेली गाणी थोडा फार फेरफार करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणली जातात. मात्र यांपैकी अनेक गाण्यांमध्ये ते मुळं गाणं त्या संगीतकाराने तयार केलं होतं. त्या व्यक्तिचा साधा उल्लेखही केला जात नाही. असाच प्रकार ‘मसक्कली २.०’ या गाण्याचे निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या रिमिक्सच्या प्रकाराला वैतागलेल्या संगीतकार समीर अंजान यांनी आता थेट कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृतपणे रिमिक्स गाण्याची निर्मिती करणाऱ्यांविरोधात आता थेट कोर्टात जाणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार समीर अंजान यांनी जावेद अख्तर यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. ते इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या संस्थेअंतर्गत ही केस लढता येईल असे समीर अंजान यांना वाटते.

या प्रकरणावर काय म्हणाले समीर अंजान?

“गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर रिमिक्स गाण्यांची निर्मिती केली जात आहे. यांतील अनेक गाण्यांना तोडून फोडून अश्लिल स्वरुपात चित्रपटांमध्ये सादर करण्यात येते. अनेकदा मुळ गाणं ज्या संगीतकाराने लिहिलं होतं, ज्याने त्याची निर्मिती केली होती त्या व्यक्तीला त्याचं क्रेडिट देखील दिलं जात नाही. हा प्रकार आता थांबवायला हवा. यावर काहीतरी निर्बंध यायला हवेत त्यामुळे आम्ही ही लढाई आता थेट कोर्टातच लढण्याचा विचार करत आहोत.” असे समीर अंजान अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले.