आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी लाखो चाहते आतुर असतात. कधी कधी तर त्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही पातळीला पोहोचतात. नुकताच असाच एक प्रकार मराठमोळा अभिनेता संग्राम समेळसोबत घडला आहे.
संग्रामने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत एक चाहती सतत मेसेज करुन त्रास देत असल्याचे म्हटले आहे. संग्रामने हा व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संग्रामने स्वीटी सातारकर नावाची तरुणी दिवसभरात तीनशे ते चारशे मेसेज करत असल्याने हैराण झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे माझ्या खासगी आणि वैवाहिक आयुष्यात अडचणी येत असल्याचे त्याने सांगितले आहे. कृपया तिचे पालक तुमच्या परिचयात असल्यास त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा अशी विनंती संग्रामने केली आहे.
संग्रामने आजवर अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ललित २०५’ या मालिकेत नील राजाध्यक्षची भूमिका साकारली. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. तसेच त्याने रंगशारदा प्रतिष्ठान निर्मित ‘संगीत एकच प्याला’ या नाटकातमध्ये काम केले.