गेल्या काही दिवसांपासून कलर्स वाहिनीवरील जितेंद्र जोशीचा ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम चर्चेत आहे. या कार्यक्रमात जितेंद्र कलाकारांच्या आयुष्यातील गुपिते सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. अभिनयाच्या पलिकडील त्यांचे आयुष्य, त्यांची मते तसेच आठवणी गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न जितेंद्र करताना दिसतो. नुकताच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये अभिनेते संजय मोने आणि आनंद इंगळे यांनी हजेरी लावली. दरम्यान त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयीच्या अनमोल आठवणींना उजाळा दिला आहे.
‘तू जन्मापासून शिवाजी पार्कमध्ये वाढलेला आहेस. शिवाजी पार्क हा तुझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. खेळापेक्षा जास्त सभेसाठी शिवाजी पार्क ओळखले जाते. पार्कामधील एखादी गाजलेली सभा आठवते का?’ असा प्रश्न जितेंद्रने संजय यांना विचारला.
आणखी वाचा : शुभांगी गोखलेंनी तो फोटो पाहिला आणि…
त्यावर संजय यांनी आचार्य अत्रे यांचे पहिले भाषण ऐकले होते असे म्हटले. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या गाजलेल्या भाषणांच्या आठवणी जाग्या केल्या. ‘त्याकाळी बाळासाहेबांची काय भाषणे व्हायची. बरं गंमत अशी की आपण बघतो लोकं भाषण देताना शिरा ताणून बोलतात. पण बाळासाहेब कधीच शिरा ताणून बोलले नाहीत. अत्रेंच्या पुस्तकात असं होतं की ते मोठ्या लोकांशी गप्पा मारायला बसल्यासारखे बोलायचे. तसे बाळासाहेबांच्या भाषणामध्ये एक गप्पा मारायला बसल्याचा अनुभव यायचा. राज ठाकरेची ही भाषणे तशीच असतात थोडी फार. पण आजकाल लोकांची मने मुरदाड झाल्यामुळे त्याला थोडे अजून जोरात सांगावे लागते’ असे संजय म्हणाले.