‘माऊण्टन मॅन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दशरथ मांझी यांच्या पराक्रमाशी आमिर खानची ओळख ‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या पर्वात झाली होती. २२ वर्षे एकटय़ाने पहाड खोदून रस्ता बनविणाऱ्या दशरथ मांझी यांच्या जिद्दीने आमिर खान भारावून गेला होता. मात्र हे भारावलेपण पहिल्या पर्वापुरते मर्यादित राहिले नाही. ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात या जिद्दीच्या महामार्गावरून करावी, असे आमिरच्या मनाने घेतले. आणि स्वत: बिहारमध्ये जाऊन आमिरने त्याच रस्त्यावरून प्रवास करत ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली.
‘सत्यमेव जयते’च्या  पहिल्या पर्वात वेगवेगळ्या समस्या हाताळताना आमिरला दशरथ मांझी यांची माहिती मिळाली. बिहारमधील गया शहरातील गेलूर नावाच्या गावात दशरथ मांझी यांचे कुटुंब आजही वास्तव्यास आहे. दररोज एक भलामोठा डोंगर चढून दुसऱ्या गावी जाणाऱ्या गावकऱ्यांची कथा आणि व्यथा नवीन नव्हती. परंतु, दगडधोंडय़ांच्या वाटेत ठेचकाळून पडल्याने पत्नीला झालेल्या यातना मांझी यांना पाहवल्या नाहीत. एक हातोडा आणि छिन्नी घेऊन मांझी यांनी तो डोंगर फोडायचे ठरविले. तब्बल २२ वर्षे कुणाचीही मदत न घेता मांझी यांनी तो डोंगर फोडून गावासाठी रस्ता तयार केला. त्यांची ही जिद्द की त्यांनी घेतलेला ध्यास असेल, आमिरला मात्र त्याचवेळी तिथे जाऊन मांझी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची इच्छा होती. ती इच्छा आमिरने दुसऱ्या पर्वाची सुरुवात करताना पूर्ण केली आहे.
आमिरने स्वत: टीमसोबत गेलूर गावात जाऊन मांझी यांच्या परिवाराची भेट घेतली. मांझी यांनी तयार केलेल्या रस्त्यावरून प्रवास करत त्याने ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात केली.
पहिल्या पर्वापेक्षाही दुसऱ्या पर्वात आमिरने शोबद्दलची कुठलीही माहिती लोकांसमोर येणार नाही, याची काटेकोर दक्षता घेतली आहे. या पर्वासाठी सहभागी होणारे प्रेक्षकही आमिरने निवडले असून त्यांच्याकडून एपिसोड प्रसारित होण्याआधी कोणत्याही प्रकारे माहिती बाहेर जाणार नाही याबद्दलचा करार करून घेतला आहे. आमिरचा हा बहुचर्चित शो २ मार्चपासून स्टार प्लस वाहिनीवर सुरू होणार आहे.