बॉलीवूडच्या ‘खान’दानातील एक खान नुकताच काही दिवसांसाठी ‘चाळ’करी झाला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी का होईना शाहरुख खान चक्क चाळकरी बनला. शाहरुखच्या चाळकरी जीवनाची काही छायाचित्रे ‘ट्विटर’वर ‘एसआरके फॅन पेज’वर अपलोड करण्यात आली आहेत.
बॉलीवूडच्या ‘स्टार्स’नी चाळकरी जीवनाचा अनुभव प्रत्यक्षात घेतला असण्याची शक्यता तशी दुरापास्तच. कारण काही अपवाद वगळता अनेकांचे लहानपणच उच्चभ्रू वसाहतीतील पॉश घरांमध्येच गेले. त्यामुळे चाळसंस्कृती आणि तेथील जीवन कसे असते ते या स्टार्सना माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही.
पण कलाकाराला एखाद्या भूमिकेसाठी आणि ती वास्तववादी वाटावी म्हणून का होईना कधी आपल्या नेहमीच्या जीवनानुभवापेक्षा वेगळे काहीतरी करण्याची संधी मिळते. शाहरुख खान याला ‘फॅन’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तशी संधी मिळाली आणि चित्रीकरणाच्या निमित्ताने का होईना तो ‘चाळ’करी झाला.
बॉलीवूडमध्ये सध्या शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटाची चर्चा आहे. लहान मुलांना बरोबर घेऊन त्याने या चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात शाहरुखसोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ फेम वाणी कपूर प्रमुख भूमिकेत आहे. यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘बॅण्ड बाजा बारात’ व ‘शुद्ध देसी रोमान्स’चा मनीष मल्होत्राच करणार आहे.
चित्रपटातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण नुकतेच मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे करण्यात आले. चाळकरी संस्कृतीतील शाहरुख येथे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘फॅन’ या चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत आहे. ‘सुपरस्टार’ आणि त्याचा ‘फॅन’ अशा दोन भूमिका तो करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan shoots for fan at a mumbai chawl