‘एजंट राघव’च्या सेटवर डमीबरोबर चित्रिकरण!
‘लय भारी’ चित्रपटातील संग्रामच्या भूमिकेपासून अभिनेता शरद केळकरच्या कारकिर्दीला चांगलीच कलाटणी मिळाली आहे. छोटय़ा पडद्यावर तो नावाजलेला होताच मात्र आता तो एवढा ‘मोठा’ कलाकार झाला आहे की त्याच्या प्रसिध्दीच्या चांदण्याखाली त्याच्या सहकलाकारांचे श्वास कोंडू लागले आहेत. ‘एजंट राघव’ या ‘अँड टीव्ही’ वरील मालिकेला शरदच्या स्टारी नखऱ्यांचा चांगलाच फटका बसला असून एरव्ही पडद्यावर एकत्र वावरणाऱ्या या टीमने शरदबरोबर चित्रिकरण करण्यास नकार दिला आहे. शरदच्या डमीबरोबर या कलाकारांचे चित्रिकरण सुरू आहे.
छोटय़ा पडद्यावर शरद केळकर हे नाव खूप गाजलेले आहे. सोनी टीव्हीवरच्या ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेत काम केल्यानंतर त्याने मराठी-हिंदी चित्रपटांमधूनही काम करत आपला पसारा वाढवला आहे. हिंदीत त्याने ‘राम-लीला’, ‘हिरो’, ‘१९२०-एव्हिल रिटर्न्स’सारखे चित्रपट केले तर मराठीतही ‘संघर्षयात्रा’ चित्रपटात त्याने भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची भूमिका केली आहे. शिवाय, एकाचवेळी तो छोटय़ा पडद्यावर ‘एजंट राघव’ ही ‘अँड टीव्ही’वर आणि ‘शैतान’ ही मालिका ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर काम करतो आहे. त्याच्या या कधी इकडे, कधी तिकडे कामामुळे सतत ‘एजंट राघव’च्या चित्रिकरणात बदल होत राहतात. मालिकेच्या निर्मिती कंपनीचाही तो लाडका असल्याने शरदच्या वेळेनुसार चित्रिकरणाचे नियोजन केले जाते. तो मोठा कलाकार असल्याने निर्मिती कंपनीकडून त्याचे सगळे लाड पुरवले जातात आणि तोही आपल्या ‘स्टार’ असण्याचा फायदा घेत असल्याची तक्रार त्याच्या सहकलाकारांनी केली असल्याचे सेटवरच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
शरद आणि ‘एजंट राघव’मधील त्याच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेत असलेले कलाकार यांच्यातील हा वाद इतका विकोपाला गेला आहे की शरद स्वतंत्रपणे त्याचे चित्रिकरण करतो आहे. तर त्याचे सहकलाकार त्याच्याबरोबर काम न करता त्याच्या डमीबरोबर चित्रिकरण करत आहेत.

हे सगळे खोटे
शरदने मात्र हे सगळे खोटे असल्याचे म्हटले आहे. ‘एजंट राघव’च्या सेटवर सगळे आलबेल आहे. आमचे युनिट एकदम छोटे पण एकमेकांशी घट्ट बांधलेले आहे. आणि एखाद्या कलाकाराला आपल्याबद्दल काही अडचण असेल तर आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती नाही, असे शरदने स्पष्ट केले आहे.