आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीच्या विविध विषयांवरील सिनेमांद्वारे भारतीय सिनेमात योगदान देणारे भारतातील श्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक असलेले दिग्दर्शक श्याम बेनेगल १४ डिसेंबर रोजी वयाची ८१ वर्षे पूर्ण करीत असून त्यानिमित्त त्यांचा विशेष गौरव करता यावा म्हणून ओशियानामा या संस्थेतर्फे सोमवारपासून न्यू मरिन लाइन्स येथील लिबर्टी चित्रपटगृहात बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या १४ चित्रपटांचा महोत्सव सुरू होत आहे. बेनेगल यांचे सलग १४ चित्रपट एकाच महोत्सवात पाहण्याची दुर्मीळ संधी चित्रपटप्रेमींना उपलब्ध होणार आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते भारतातील नव सिनेमाचे उद्गाते बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अंकुर’ या पहिल्या चित्रपटाबरोबरच अमूल दूध चळवळीवरील विजय तेंडुलकर लिखित ‘मंथन’, ‘निशांत’, ‘त्रिकाल’, ‘जुनून’, ‘सूरज का सातवा घोडा’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘बोस : द फरगॉटन हिरो’, ‘मम्मो’, सुस्मन’ इत्यादी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक नेव्हिले तुली यांनी दिली.
१९७० च्या दशकात रंगभूमीवरील उत्कृष्ट कलावंतांना श्याम बेनेगल यांनी चित्रपटातून आणले. ओम पुरी, अमरिश पुरी, अनंत नाग, शबाना आझमी, नासिरुद्दीन शहा, रजत कपूर अशा कलावंतांना त्यांनी प्रमुख भूमिकेसाठी निवडले. वास्तविक रंगभूमीवरील कलावंतांना चित्रपटात घेण्याची पद्धत तेव्हा रूढ नव्हती. परंतु याला बेनेगल यांनी छेद दिला, ही महत्त्वाची बाब असल्याचे नेव्हिली तुली यांनी स्पष्ट केले.
महोत्सवाचा रेड कार्पेट उद्घाटन सोहळा होणार असून नसीरुद्दीन शहा, स्वत: श्याम बेनेगल आणि नेव्हिले तुली यांच्या गप्पांनंतर ‘जुनून’ हा १९७८ सालचा त्यांचा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील प्रमुख कलावंत दीप्ती नवल, कुलभूषण खरबंदा, कुणाल कपूर, नसीरुद्दीन शहा, चित्रपटाचे छायालेखक गोविंद निहलानी व अन्य कलावंत उपस्थित राहणार आहेत. सात वेळा राष्ट्रीय पारितोषिक मिळविणारे बेनेगल यांचा ‘मास्टर क्लास’ही आयोजित करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘भारत एक खोज’ या बेनेगल यांच्या दूरदर्शनवरील मालिकेचे भागही रसिकांना पाहायला मिळणार आहेत.